प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज : सावळज (ता. तासगाव) बदलते हवामान, अवकाळी पाऊस आणि विविध रोगांच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष शेती अनेक अडचणींचा सामना करत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे द्राक्ष शास्त्रज्ञ डॉ. कोबस बोथमा हे शनिवारी (दि. १४ मार्च) सावळज येथे येऊन द्राक्ष बागांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. तसेच ते परिसरातील द्राक्ष बागायतदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणार असल्याची माहिती द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक राजेंद्र हिंगमिरे यांनी दिली आहे.
गेल्या काही वर्षांपासून बदलते हवामान, अवकाळी पाऊस आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे द्राक्ष शेती मोठ्या संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे तज्ज्ञ आपल्या भागात येत असल्यामुळे स्थानिक द्राक्ष बागायतदारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून बदलत्या हवामानाशी जुळवून घेत द्राक्ष शेती कशी करावी, उत्पादनाची गुणवत्ता कशी वाढवावी आणि येणाऱ्या काळात कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत याबाबत शेतकऱ्यांना अभ्यासपूर्ण माहिती मिळणार आहे.
सदरचा कार्यक्रम द्राक्ष प्रगतशील बागायतदार श्री सतीश मस्के यांच्या द्राक्षबागेमध्ये शनिवारी दिनांक 14 मार्च रोजी ठीक सायंकाळी 4 वाजता होणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन द्राक्ष बागायतदार संघ पुणे संचालक श्री राजेंद्र हिंगमीरे यांनी केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने सांगली येथे दि. १५ मार्च रोजी द्राक्ष खरड छाटणी विषयावर तांत्रिक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर द्राक्ष बागायतदार संघामार्फत राज्यातील विविध तालुक्यांतील प्रमुख गावांमध्ये “शेतकरी संवाद” कार्यक्रम आयोजित करून द्राक्ष बागायतदारांशी थेट चर्चा केली जात आहे. त्याच अनुषंगाने सावळज येथेही शनिवारी हा शेतकरी संवाद आयोजित करण्यात आला आहे.
द्राक्ष बागायतदारांना तांत्रिक व शास्त्रीय मार्गदर्शन मिळावे, तसेच बदलत्या परिस्थितीत शेती अधिक सक्षम करण्यासाठी नवीन संकल्पना आणि उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ अशा उपक्रमांचे आयोजन करत आहे.
परिसरातील सर्व द्राक्ष बागायतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक राजेंद्र हिंगमिरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या