प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज: अल्फोन्सा स्कूल, मिरज येथे मराठी विज्ञान परिषदेचा हा उपक्रम, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या सहकार्याने मूलभूत विज्ञान प्रयोगांवरील शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९.०० ते ११.०० या कालावधीत झालेल्या या कार्यशाळेत वालचंद कॉलेजचे १६ अभियांत्रिकी विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी इयत्ता सहावी ते नववी मधील विद्यार्थ्यांसाठी विज्ञानातील मूलभूत संकल्पनांचे सखोल व प्रात्यक्षिक स्वरूपात सादरीकरण केले.ही कार्यशाळा सांगली जिल्हा समन्वयक मा. सुनील देशपांडे व संगणक विभागाचे प्रा. अनिल सुर्वे आणि प्रा. दत्तावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षणशक्ती आणि तर्कशक्ती विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यशाळेदरम्यान गुरुत्वाकर्षण, ध्वनीलहरी, प्रकाशाचे परावर्तन व अपवर्तन, पृष्ठताण तसेच गुरुत्वकेंद्र या विषयांवरील विविध प्रयोग सादर करण्यात आले.सदर प्रयोग हस्तप्रयोग पद्धतीने राबविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना संकल्पनांचे प्रत्यक्ष अनुभवातून आकलन झाले. प्रत्येक प्रयोगामागील वैज्ञानिक तत्त्वे सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग उत्स्फूर्त व अर्थपूर्ण ठरला.हा उपक्रम अल्फोन्सा शाळेच्या विज्ञान विभागाच्या पुढाकाराने राबविण्यात आला. अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाधारित शिक्षणास पूरक ठरणारे अनुभवाधारित व संशोधनाभिमुख शिक्षण मिळते, असे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल वालचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचे, शाळेचे व्यवस्थापक फादर चँडी कलतुर, उपमुख्यद्यापक फादर बिनील यांनी आभार मानले. अशा शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन मुलांच्या शास्त्रीय बुद्धिमत्तेमध्ये वाढ होण्यासाठी सातत्याने आयोजित केले जातील असे शाळेचे मुख्याध्यापक फादर सिजू जॉर्ज म्हणाले.या कार्यशाळेचे नियोजन शास्त्र विभागाचे शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या