प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 19 : सांगली पॅटर्न - किल्ले महोत्सव अंतर्गत शिराळा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘किल्ले महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार सत्यजीत देशमुख, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शामला खोत पाटील, मुख्याधिकारी सूरज कांबळे, नगरपंचायत, पंचायत समिती तसेच विविध विभागांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले, गटविकास अधिकारी विजय नलवडे, वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेटे, जिल्हा परिषद सदस्य साईतेजस्वी देशमुख, तसेच नगरसेवक महेश खंडागळे, अर्चना कदम यांच्यासह रणधीर नाईक, ज्योतिर्लिंग पाटील, विकास रोकडे, सुहास रोकडे, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक यांनी प्रत्येक गड किल्ल्यावर ‘स्मृतीगंध’ पुस्ताकातील एका लेखाचे वाचन व्हावे असा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार गड किल्ल्यावर तसेच तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘शिवाजी – एक महान नेता’ या लेखाचे सामूहिक वाचन करून शिवरायांच्या नेतृत्वगुणांची व व्यवस्थापन कौशल्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आली.
या प्रसंगी लोहार गल्ली पूल ते भुईकोट किल्ला या मार्गावर पदयात्रा काढण्यात आली. किल्ल्यावर शिवप्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पारंपरिक पाळणागीताने वातावरण भक्तिमय झाले.
प्रसिद्ध व्याख्याते विश्वास घोडे यांनी ‘आजच्या युवकांपुढील आदर्श – छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी शौर्यगीतांवर नृत्याविष्कार सादर केला, तसेच पोवाडा गायन करण्यात आले. वक्तृत्व आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या