प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : संयुक्त शिवजयंती उत्सव समिती व शिव स्मारक समिती, गगनबावडा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (२०२६) अत्यंत प्रेरणादायी आणि ऐतिहासिक वातावरणात साजरी करण्यात आली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित या सोहळ्याला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
*विधीवत पूजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम*
कार्यक्रमाची सुरुवात सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ आणि नायब तहसीलदार राजेंद्र दुलंगे यांच्या हस्ते शिवप्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी गगनबावड्यातील महिलांनी पारंपरिक शिवपाळण्याचे गायन करून मंगलमय वातावरण निर्मिती केली. सिंधुदुर्ग डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी सकाळीच शिवस्मारक स्थळाला भेट देऊन माहिती घेतली.
*मर्दानी खेळांचे थरार आणि वैचारिक मेजवानी*
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण कोल्हापूरच्या 'शिवगर्जना जरगनगर' पथकाचे चित्तथरारक मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक ठरले. तलवारबाजी आणि लाठीकाठीच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
वैचारिक प्रबोधन करताना शिवव्याख्याते सिद्धेश कुपले यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. तसेच, शेलार नावाच्या चिमुकलीसह अन्य छोट्या मुलींनी शिवरायांच्या बद्दल दिलेली भाषणे उपस्थितांची दाद मिळवून गेली.
*मान्यवरांची उपस्थिती*
या सोहळ्याला नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, सोनाली विलास पाटील, प्रकाश पाटील, राजेश पाटील, सोम प्रकाश माळी, शिवाजी राऊत, एस. के. पाटील, संदीप पाटील, इंद्रजीत मेंगाने, भिवाजी वरेकर, अनिल लटके, विजय परीट, सुनील पांगळे, कृष्णात यादव यांसह तालुक्यातील अनेक मान्यवर, शिवभक्त आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
*नियोजन आणि आभार*
या संपूर्ण सोहळ्याची संकल्पना प्रकाश पाटील यांची होती, त्यांनीच कार्यक्रमाची सांगता व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विजय केरबा पाटील यांनी केले. शिव स्मारक समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या