प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्या तरी निर्णयक्षमतेत खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाल्या आहेत का, असा थेट सवाल करत “स्त्री मिळवती झाली; पण ठरवती झाली आहे का?” असे परखड मत संमेलनाध्यक्ष सोनाली नवांगुळ यांनी व्यक्त केले. त्या आम्ही सिद्ध लेखिका संस्था आयोजित चौथ्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात बोलत होत्या.
दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी मिरज येथील पटवर्धन सभागृहात दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. संमेलनाची सुरुवात सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीने झाली. ज्येष्ठ लेखिका निर्मला लोंढे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन कविभूषण डॉ. जयश्री श्रेणिक पाटील, सांगली जिल्हा प्रमुख मनीषा रायजादे पाटील यांच्या हस्ते झाले.
संमेलनाध्यक्ष सोनाली नवांगुळ म्हणाल्या की, स्त्रियांनी डिजिटल साक्षर होणे ही काळाची गरज आहे. धार्मिक आस्था असायला हरकत नाही; मात्र तिचे स्तोम माजवू नये. निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग वाढला पाहिजे, तरच सक्षमीकरण पूर्णत्वाला जाईल.
स्वागताध्यक्ष मा. उषाताई चांदोरकर यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी ती अधिक समृद्ध करण्यासाठी बोली भाषेतून साहित्यनिर्मिती, तसेच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने साहित्याचा अनुवाद होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्या डॉ. छाया महाजन यांनी साहित्य संमेलनांचा हेतू, लेखक-वाचक संवाद आणि वाचकांच्या आस्वादक्षमतेवर चिंतन केले. भाषा संवर्धन करताना माणूसपण जपले गेले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. विशेष अतिथी म्हणून उद्योजिका भूमी मगदूम उपस्थित होत्या.
दुपारच्या सत्रात मा. डॉ. तारा भवाळकर यांची प्रकट मुलाखत विशेष आकर्षण ठरली. त्यांनी स्त्री आणि सीतायन या विषयावर सखोल मांडणी करत “स्वातंत्र्य मागून मिळत नाही; ते मिळवावे लागते” असा संदेश दिला. मुलाखत डॉ. राजश्री पाटील व डॉ. स्मिता पाटील यांनी घेतली.
संमेलनात पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन, गझल मुशायरा, परिसंवाद, कथाकथन आणि सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम पार पडले. या वेळी ११ लेखिकांची पुस्तके मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. राज्यभरातून २५० ते ३०० महिला लेखिका संमेलनात सहभागी झाल्या होत्या.
संमेलनाचे आयोजन आम्ही सिद्ध लेखिका संस्था यांच्या अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली, सांगली जिल्हाध्यक्ष मनीषा रायजादे पाटील व जिल्हा कार्यकारिणीने केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. स्वाती पाटील व मनीषा पाटील हरोलीकर, तर प्रारंभ जस्मिन शेख यांनी केला. महिला साहित्य, लोकसाहित्याचा प्रचार-प्रसार आणि स्त्रीवादी विचारांचा व्यापक संवाद घडवणारे हे संमेलन ठळक ठरले.
पश्विम विभागाचे नेटके नियोजन
आम्ही सिद्ध लेखिका संस्थेचे चौथे राज्यस्तरीय संमेलन मिरज येथे अतिशय थाटामाटात संपन्न झाले. संस्था अध्यक्ष प्रा. पद्मा हुशिंग या़ंच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या संमेलनाचे आयोजन या वर्षी पश्चिम विभागाने केले होते आणि त्याचे समग्र नियोजनाची जबाबदारी पश्चिम विभाग प्रमुख आणि सांगली जिल्हा प्रमुख मनीषा रायजादे पाटील आणि समग्र सा़ंगली जिल्हा कार्यकारणीने घेतलेली होती. याचे अत्यंत नेटके नियोजन या संमेलनाचे केल्याचे कौतुक राज्यभरातील साहित्यिकांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या