प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील निवडणूक रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून, गगनबावडा आणि असळज या प्रमुख केंद्रांमध्येच राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. भाजप–शिवसेना महायुती आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात तालुक्यात सर्वत्र सरळ दुरंगी सामना रंगत असून, तुल्यबळ उमेदवारांमुळे प्रचारात चांगलीच रंगत आली आहे.
🟢 गगनबावडा गटात कडवी झुंज
गगनबावडा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार संभाजी शांताराम पाटील आणि शिवसेना–भाजप महायुतीचे उमेदवार, माजी पंचायत समिती सदस्य आनंदा पाटील यांच्यात अत्यंत कडवी झुंज पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी प्रचाराचा जोर वाढवण्यात आला असून, आरोप–प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
🟡 असळज पंचायत समिती गण लक्षवेधी
असळज पंचायत समिती गणातून काँग्रेसचे राजेश पाटील आणि महायुतीचे संदीप पाटील यांच्यातील सामना देखील चुरशीचा ठरत आहे. असळज परिसरात प्रचार सभा, बैठका आणि संपर्क मोहिमा यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
🔴 तिसंगी व असंडोलीतही संघर्ष तीव्र
तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजप–सेना महायुतीच्या सौ. कल्पना एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काँग्रेसच्या ॲड. सोनाली विलास पाटील यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.
पंचायत समिती तिसंगी गणात काँग्रेसचे अमर केशव कांबळे विरुद्ध भाजप–सेनेचे संजय मारुती कांबळे यांच्यात थेट लढत होत आहे.
असंडोली गणातून सभापती पदाच्या दावेदार माजी सभापती लोकनेते लहू बाळा देसाई यांच्या सून सौ. छाया प्रकाश देसाई यांना भाजप–सेना युतीच्या रुपाली विठ्ठल जाधव यांनी जोरदार आव्हान दिले आहे.
🔵 धुंदवडे गणातही चुरस
धुंदवडे पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या सौ. शुभांगी संकपाल आणि भाजप–सेना युतीच्या सौ. महानंदा म्हसकर यांच्यात चुरशीची लढत रंगली आहे.
🔵नेत्यांच्या सभांनी वातावरण तापले
खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या प्रचार सभांमुळे वातावरण अधिकच तापले आहे. कालच गगनबावडा तसेच जर्गी येथे सतेज पाटील यांची जोरदार सभा पार पडली.
पारडे कुणाचे जड?
सध्याच्या घडीला काँग्रेसचे पारडे काहीसे जड वाटत असले, तरी आमदार चंद्रदीप नरके, अजित नरके आणि पी. जी. शिंदे यांनी उभ्या केलेल्या अंतर्गत जोडण्या कितपत यशस्वी ठरतात, यावर महायुतीच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
दोन्ही गटांकडून विजयाचे दावे होत असले, तरी जनता जनार्दन कोणाचा टांगा पलटी करणार, हे ७ तारखेच्या मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे. विशेषतः ‘लाडकी बहीण’ नेमका कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या