प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : इंग्रजी भाषेच्या माध्यमातून एनसीईआरटीच्या अभ्यासासाठी व आपल्या पाल्यांच्या राष्ट्रीय उज्वल भवितव्यासाठी केंद्र शासनाच्या ई-पाठशाला व इतर ॲप्सचा संस्थाचालक,शिक्षक,पालक,
विद्यार्थी सर्वांनी वापर करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केले.
रायझिंग स्टार्स एज्युकेशन सोसायटी येळावी च्या इंग्लिश अकॅडमीच्या पाचव्या पारितोषिक वितरण समारंभ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील बोलत होते. महिला पालकांच्या वर्षभरातील विविध स्पर्धा,पाककला,गौरी गणपती सजावट,किल्ला बांधणी, याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शालेय सहशालेय स्पर्धांच्या बक्षिसांचे वितरण प्रमुख पाहुणे शशिकांत पाटील, ॲड.धैर्यशील पाटील,माजी सैनिक सुरेश माळी,कृषी विभागाचे दशरथ गावडे आधी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
किड्स टॅलेंट येळावीच्या रेहाना पठाण,खालीद पठाण सर्व स्टाफच्या वतीने कार्यक्रमाचे अतिशय नियोजनबद्ध आयोजन करण्यात आलेले होते.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये जिजाऊ मासाहेबांचे योगदान, बदलत्या पालकत्वाच्या आई आणि वडिलांच्या जबाबदाऱ्या, इंग्रजी मुळे मिळणाऱ्या संधी व या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व शैक्षणिक ॲप्स यांची माहिती दिली.
बदलत्या काळामध्ये आहार, अभ्यास, आरोग्य, आचरण व आदर्श या पंचसूत्रीच्या आधारे विद्यार्थ्यांनी सकस आहार घेत, आरोग्याच्या काळजी सोबत आई-वडील शिक्षकांना आदर्श मानून सदाचरण करत अभ्यास करावा असे आवाहन त्यांनी केले.
विशेषत: डोळ्यांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये दोन वर्षापर्यंत डोळ्याचा आकार 16 एमएम पर्यंत वाढत असून त्यानंतर पोगंडावस्थेत तो 24 एम एमचा आकार धारण करतो या काळामध्ये योग्य आहार,वाचण्याच्या योग्य सवयी, नैसर्गिक रित्या पिकलेल्या विटामिन ए संपृक्त फळांचा समावेश आहारात करावा असे आवाहन त्यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित शिवदिनदर्शिका यावेळी अकॅडमीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तर अकॅडमी कडून पाहुण्यांना गुलाबपुष्प रोपांचे भेट म्हणून वितरण करण्यात आले.
येळावी व परिसरातील बहुसंख्य पालक-विद्यार्थी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या