प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या गव्हाण (ता. तासगाव) शाखेमध्ये शासनाच्या शेतकरी अनुदान खात्यावर तब्बल १२ लाख ३२ हजार ८५४ रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी शाखेतील दोन जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात तासगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेचे अधिकारी प्रवीण कोळी यांनी फिर्याद दिली असून,शाखा अधिकारी बाबासो बाळासाहेब पाटील (रा. बोरगाव) व सिनिअर असिस्टंट अरुण दादासो पाटील (रा.बिसूर) यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,२०१९ ते २०२० या कालावधीत अरुण पाटील यांनी पदाचा गैरवापर करून शासकीय शेतकरी अनुदान खात्यांमधून रक्कम परस्पर काढली. संबंधित खातेदारांच्या संमतीशिवाय स्लिपवर बनावट सह्या करून रक्कम उचलण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.या गैरव्यवहारादरम्यान तत्कालीन शाखा अधिकारी बाबासो पाटील यांनी मोठ्या व्यवहारांमध्ये सह्यांची पडताळणी न करता संशयास्पद रक्कम काढण्यास परवानगी दिल्याचे समोर आले आहे.बँकेच्या नियमानुसार मोठ्या रकमेच्या व्यवहारावेळी सह्यांची खातरजमा करणे बंधनकारक असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.शासकीय पातळीवर सखोल चौकशी केल्यानंतर अपहार स्पष्ट झाल्याने दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.सध्या तासगाव पोलीस ठाणे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून,या घोटाळ्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का,याचाही शोध घेतला जात आहे.या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात तसेच शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली असून, बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या