प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :शहराला पाचव्या मैलावरून पाणीपुरवठा करणारी मुख्य वाहिनी ज्योतिबा मंदिराजवळ फुटल्याने निर्माण झालेले गंभीर संकट अवघ्या २४ तासांत दूर करण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रशासकीय समन्वय,तांत्रिक कौशल्य आणि युद्धपातळीवरील कामामुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.घटनेची माहिती मिळताच माजी आमदार संजयकाका पाटील यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित गळती विजापूर–गुहागर राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याखाली झाल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. रस्ता न फोडता दुरुस्ती करणे हे मोठे तांत्रिक आव्हान होते.या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून महामार्गाचे नुकसान टाळत दुरुस्ती करण्याचा मार्ग काढण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार नगरपालिकेच्या पथकाने रस्त्याला कोणतीही हानी न पोहोचवता खालून ‘टॅपिंग’ आणि नियंत्रित खोदकाम करून गळती दुरुस्त केली.संजयकाका पाटील यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.या जलद आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, प्रशासनाच्या तत्परतेचे शहरभर कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या