प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:लोकशाही हा केवळ सरकार निवडून देण्याचा पाच वर्षांचा तांत्रिक सोहळा नाही,तर तो शोषितांना आणि सामान्यांना प्रश्न विचारण्याची 'हिंमत' देणारा अधिकार आहे.दुर्दैवाने आज ही लोकशाही सामान्य माणसाच्या हातून निसटून धनशक्तीच्या विळख्यात अडकतेय की काय,अशी भीती वाटते,असे परखड मत न्यूज १८ मराठीचे अँकर विलास बडे यांनी व्यक्त केले.येथील साने गुरुजी नाट्यगृहात आर.आर.(आबा) पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त रोहितदादा कल्चरल ग्रुप व जिव्हाळा सोशल फाउंडेशन च्यावतीने आयोजित 'लक्षवेधी व्याख्यानमालेत' ते बोलत होते. 'लोकशाही: काल,आज आणि उद्या' या विषयावर बोलताना त्यांनी भारतीय लोकशाहीचा प्रवास, आव्हाने आणि सद्यस्थितीचा अत्यंत सखोल आढावा घेतला.यावेळी माजी आमदार सुमनताई पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प) माजी तालुकाध्यक्ष हणमंतराव देसाई,जेष्ठ विचारवंत डॉ.बाबुराव गुरव,कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र पाटील,वासंती सावंत प्रमुख उपस्थित होते.प्रारंभी दिवंगत आर.आर.(आबा) पाटील व अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे विलास बडे यांच्याहस्ते प्रतिमपूजन करण्यात आले.यावेळी दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.विलास बडे पुढे म्हणाले,भारतात लोकशाहीची खरी बीजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली.अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून त्यांनी समतेची मूल्ये रुजवली.स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी,पंडित नेहरूंनी राष्ट्र उभारणीचे स्वप्न पाहिले,तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाचा भक्कम पाया रचला.ज्या वेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले,तेव्हा ८० टक्के जनता निरक्षर होती. जगातल्या मोठ्या विद्वानांना वाटले होते की,इतक्या जाती,भाषा आणि गरिबी असलेल्या देशात लोकशाही टिकणार नाही.मात्र,फाळणीच्या जखमा सोसूनही या देशातील सामान्य माणसाने लोकशाही जिवंत ठेवली.१९७५ ची आणीबाणी हा लोकशाहीच्या प्रवासातील सर्वात मोठा धक्का होता,असे नमूद करत बडे म्हणाले, १९७७ साली इथल्या जनतेने दाखवून दिले की लोकशाही केवळ कागदावर नाही.त्यांनी बलाढ्य नेतृत्वालाही मतपेटीतून घरी बसवले.आज लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता येत असली आणि तंत्रज्ञानामुळे सामान्य माणसाचा विश्वास वाढत असला,तरी काही मूलभूत प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.
*आर्थिक विषमतेची दरी* --- देशातील आर्थिक विषमतेवर बोट ठेवताना त्यांनी धक्कादायक आकडेवारी मांडली. आज देशातील केवळ १ टक्के लोकांकडे २२.६ टक्के संपत्ती आहे. ७७ टक्के संपत्ती केवळ १० टक्के धनदांडग्यांच्या हातात एकवटली असून उर्वरित १३ टक्क्यांत संपूर्ण देश जगतोय. जिथे १०० कोटींचे आलिशान फ्लॅट्स आहेत, त्याच इमारतीखाली उघड्यावर गरीब झोपतोय, ही विषमता लोकशाहीसाठी घातक आहे,असा इशारा त्यांनी दिला. सरकारी रुग्णालयांत सुरू झालेले शुल्क आणि वाढती बेरोजगारी यामुळे सामान्य कुटुंबावर मोठे अरिष्ट येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
*राजकारणाचे बाजारीकरण आणि घराणेशाही* ----- आज राजकारण सोपे राहिलेले नाही. निव्वळ तत्त्वावर आणि निष्ठेवर निवडणूक लढवण्याची हिंमत सामान्य माणूस करू शकतो का? केवळ पैसा टाकायचा आणि पैसा काढायचा, हेच चक्र सुरू आहे. एकाच घरात पाच-पाच उमेदवार असणे, हे लोक अजूनही राजेशाहीच्या मानसिकतेतून बाहेर आली नसल्याचे लक्षण आहे. सुशिक्षित माणसं जेंव्हा म्हणतात की एका मताने काय होणार, तेंव्हा लोकशाही खऱ्या अर्थाने धोक्यात येते, असे ते म्हणाले.
*माध्यमे आणि संस्थांची विश्वासार्हता* ---- लोकशाहीचे स्तंभ असलेल्या स्वायत्त संस्था आणि माध्यमांच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले. सामान्य माणसाचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणे हे माध्यमांचे काम आहे, पण आज सामान्य माणसाला माध्यमांवर विश्वास वाटतो का हे पाहणेही आवश्यक आहे. निवडणूक आयोगासारख्या संस्थांनी कोणाचे 'बटीक' बनणे अयोग्य आहे. जर ६० टक्के लोक मतदानाच्या दिवशी सहलीला जात असतील, तर आपण कोणत्या लोकशाहीकडे चाललो आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे,असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले.मान्यवरांचे स्वागत स्वप्नील जाधव यांनी केले,तर प्रास्ताविक दत्तात्रय सपकाळ यांनी केले.पाहुण्यांचा परिचय संस्कृती माळी यांनी केला.सूत्रसंचालन विक्रांत पाटील यांनी केले.तर संजय माळी यांनी आभार मानले.
चौकट :
१) *तरुणांनो, संविधानाची मूल्ये जपा!* ---- तरुण पिढीला संदेश देताना विलास बडे म्हणाले, लोकशाही एका रात्रीत कमकुवत होत नाही. तरुण पिढीला प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते, पण लोकशाहीत संयम आणि विचारांचे महत्त्व मोठे आहे. चुकीच्या गोष्टींना विरोध करून संविधानातील मूल्यांची जपणूक करणे आवश्यक आहे. सन्मानाची भाकरी सर्वांना मिळाली, तरच ही लोकशाही अधिक सदृढ होईल
२) *लोकशाहीच्या वेलीवरचं सुंदर फूल म्हणजे 'आबा'*--- लोकशाही केवळ सरकार बनवण्याचा कार्यक्रम नाही, तर ती सामान्य माणसाला प्रश्न विचारण्याचा अधिकार देणारी व्यवस्था आहे.याच लोकशाहीच्या वेलीवर उमललेलं एक अत्यंत प्रामाणिक आणि सुंदर फूल म्हणजे आर.आर.(आबा) पाटील,अशा शब्दांत न्यूज १८ मराठीचे अँकर विलास बडे यांनी दिवंगत नेते आबांच्या स्मृतींना अभिवादन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या