प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:येथील मार्केट यार्ड कार्यालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तासगाव कवठे महांकाळ मधील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य व नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा आमदार रोहित पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला.यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी तालुकाध्यक्ष विश्वास तात्या पाटिल,तसेच शहराध्यक्ष खुजट वकील यांनी बोलताना कार्यकर्त्यानी खचून न जाता कामाला लागण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील यांनी स्पष्ट शब्दांत पराभवाचे आत्मपरीक्षण करण्याची गरज अधोरेखित केली. “तालुक्यात कटफुली मतदान झाले.जिल्हा परिषदेला मतदारांनी साथ दिली, मात्र पंचायत समितीत अपेक्षित मतदान झाले नाही.यामागील कारणांचा शोध घेतला नाही तर भविष्यात त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.पराभव हा पराभवच असतो; त्याला सबबी नसतात,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सजगतेचा इशारा दिला.यावेळी आमदार रोहित पाटील यांनी आपल्या भाषणात थेट आणि स्पष्ट भूमिका मांडत संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वीकारली.“उमेदवार देताना सुकाणू समिती स्थापन केली होती.गावनिहाय आकडेवारी, स्थानिक समीकरणे आणि कार्यकर्त्यांचा विश्वास याचा सखोल अभ्यास करूनच तिकीट वाटप झाले.अनेक उमेदवार थोडक्या मतांनी पराभूत झाले,तर विजयी उमेदवार हजारो मतांनी निवडून आले.याचा अर्थ आपल्या संघटनात काहीतरी कमी पडले,” असे त्यांनी नमूद केले.ते पुढे म्हणाले, “पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जीव ओतून काम करणे गरजेचे होते.निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत नाराजांना समजावून सांगावे लागणे हे दुर्दैवी आहे. काहींना ‘पक्षाचे काम करा’ असे सांगावे लागते, ही वेदना आहे.मात्र मी कुठल्याही आव्हानाला घाबरणार नाही.”आगामी काळात अधिक आक्रमक आणि संघटित काम करण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी जाहीर केले की, “मी दर आठवड्याला पंचायत समितीत बसणार आहे.नगरपालिकेत आमच्या नगरसेवकांना अडथळे आणले जात असले तरी विकासकामांवर कुणीही गदा आणू शकणार नाही.येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत आत्मचिंतन,शिस्त आणि संघटनबांधणीच्या बळावर विजय संपादन करू.”“यापुढे केवळ पदासाठी नव्हे तर पक्षासाठी निष्ठेने आणि सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाईल. तालुक्यात पक्ष अधिक मजबूत करणे हीच खरी जबाबदारी आहे,” असे ठाम शब्दांत आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.सत्कार सोहळा केवळ अभिनंदनापुरता न राहता आगामी राजकीय रणनितीचा पाया ठरला.उपस्थित कार्यकर्त्यांनी एकजुटीचा निर्धार करत आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्याचा संदेश दिला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या