प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 14 : प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवण्याची समान संधी उपलब्ध असून, प्रत्येकाने आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याबद्दलही तितकेच जागरूक राहिले पाहिजे. प्रशासनाने राबवलेल्या योजनांचा लाभ घेणे हा लोकांचा हक्क असला, तरी त्या योजना शेवटच्या गरजू माणसापर्यंत पोहोचवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून प्रत्येक नागरिकास समान संधी मिळून न्याय लोकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा सांगलीच्या पालक न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आज व्यक्त केला.
विटा येथे आयोजित विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. जय मातादी मंगल कार्यालय येथे आयोजित या महामेळाव्यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सांगलीचे पालक न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. 1 तथा खानापूर तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. आर. भागवत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. व्ही. एस. जाधव आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
न्यायमूर्ती भारती डांगरे म्हणाल्या, समाजातील बदलत्या परिस्थितीनुसार विविध कायदे बनवण्यात आले. स्त्रियांचा होणारा शारीरिक आणि मानसिक छळ रोखण्यासाठी, हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार कायदा, महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासापासून संरक्षण देण्यासाठी विशाखा समिती, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी पोक्सो (POCSO) कायदा करण्यात आला आहे. मात्र, न्यायालयात जाण्याची वेळच येऊ नये, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याबरोबरच समाज घडवण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विधी सेवा शेवटच्या गरजू माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातत्याने कार्यरत आहे, असे सांगून न्यायमूर्ती भारती डांगरे म्हणाल्या, आपल्या हक्कासाठी न्यायालयाची पायरी चढणे आवश्यक आहे. वकिलांची फी देणे प्रत्येकाला परवडणारे नसते, अशा वेळी विधी सेवा प्राधिकरण गरजू आणि गरीब लोकांसाठी कायदेशीर सल्ला आणि वकिलांची मदत मोफत उपलब्ध करून देते. न्यायालयीन प्रक्रियेत सामान्य माणसाला लागणारी सर्व मदत प्राधिकरण उपलब्ध करून देईल. न्यायासाठी संविधानाने आपल्याला भरपूर तरतुदी उपलब्ध करून दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचे कौतुक केले. या नाटकातून घरगुती हिंसाचार, महिलांची सुरक्षितता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आल्याच्या त्यांनी सांगितले. तसेच आजच्या काळात ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्नही तितकेच महत्वाचे असून त्यांच्यासाठी विधी सेवा प्राधिकरण मदतीचा हात पुढे करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सांगलीचे पालक न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये जशी सैन्य सेवेची परंपरा आहे, तसेच प्रत्येक कुटुंबात कायदा साक्षरता असायला हवी. प्रत्येक घरात एक वकील असायला हवा. त्यासाठी कायदेविषयक शिक्षण घेणे आवश्यक आहे, असे सांगून त्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ या महामेळाव्याच्या माध्यमातून घेण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, न्याय व्यवस्था हा लोकशाहीचा कणा आहे. सर्व वकील बांधव हे या न्याय प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांनी आपल्या विद्वत्तेने आणि निष्ठेने न्यायव्यवस्थेला बळकटी दिलेली आहे. न्याय, निष्ठा आणि संविधान यांच्यामुळे समाजाचा पाया भक्कम होतो. त्यामुळे आपण सर्वांनी लोकशाही रुजवण्यासाठी प्रयत्न करूया, असे ते म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आशेचा किरण ठरत आहे. ज्यांच्या पाठीमागे कोणी नाही, त्यांच्यासाठी जर आपण प्रशासनात काम करताना आपली जबाबदारी पार पाडली, तर ते सुद्धा न्यायासाठी खंबीरपणे उभे राहण्यासारखं होईल. न्याय हा केवळ न्यायालयाचा विषय नाही, तो समाजाच्या प्रत्येक घटकाचा आणि सामूहिक जबाबदारीचा विषय आहे. प्रशासन, न्यायव्यवस्था आणि नागरिक यांच्यातील विश्वास हेच सुशासनाचे मूळ तत्त्व आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याच्या पवित्र कार्यात जिल्हा परिषद सांगली पूर्णपणे सहकार्य देईल, असे ते म्हणाले.
अपर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर म्हणाल्या, या महामेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घेऊन त्याचा लाभ घ्यावा, आपल्या ज्ञानात भर घालावी, असे सांगून त्यांनी महिला व सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाकडील विविध योजनांची माहिती दिली.
प्रास्ताविकात प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर म्हणाले, विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या माध्यमातून आज आपण न्यायव्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा एका व्यापक सामाजिक उद्दिष्टासाठी एकत्रित आणत आहोत. या महामेळाव्याचा मुख्य हेतू समाजातील सर्व घटकांना, विशेषतः गरजू महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी सरकारी योजनांची माहिती देणे, अर्ज भरून घेणे आणि शक्यतो त्वरित लाभ मिळवून देणे हा आहे. अशा मेळाव्यांमुळे सरकारी यंत्रणा आणि जनता यांच्यातील अंतर कमी होते. या माध्यमातून योजनांची प्रक्रिया सुलभ करणे आणि लोकांचा विकास करणे हा आमचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले.
सूत्रसंचालन तदर्थ जिल्हा न्यायाधीश इस्लामपूर अचला काशीकर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर विटा पल्लवी सूर्यवंशी यांनी केले. आभार जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. 1 तथा खानापूर तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष आर. आर. भागवत यांनी मानले.
यावेळी मान्यवरांनी विविध स्टॉलला भेटी देवून शासकीय योजनांची माहिती जाणून घेतली. या महामेळाव्यात विधी, महसूल, कृषि, आरोग्य, शिक्षण, वन विभाग, सामाजिक वनीकरण, जिल्हा उद्योग केंद्र, क्रीडा, परिवहन, महावितरण, जिल्हा कौशल्य विकास, सहकार, जिल्हा सैनिक कल्याण, पोस्ट ऑफिस, भूमि अभिलेख, उमेद महिला बचत गट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आदि विभागांच्या विविध योजनांचे 40 स्टॅाल लावण्यात आले होते. यावेळी विविध योजनांच्या लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात लाभाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत व देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत विधी महाविद्यालय विटाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ विटा च्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. शेवटी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, वकील संघटनाचे प्रतिनिधी, वकील, लाभार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा तसेच तालुका प्रशासकीय यंत्रणा, जिल्हा व तालुका विधी सेवा प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या