प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विज्ञानवादी दृष्टिकोन व स्त्री-पुरुष समता स्थापन करण्यासाठी देशपातळीवर कार्यरत असणारी समतावादी संघटना इंडियन स्टुडंट कौन्सिल यांच्यावतीने यावर्षी दिला जाणारा सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठीचा 'सावित्रीच्या लेकी' हा राज्यस्तरीय पुरस्काराने आम्ही भारतीय महिला मंचच्या राज्याध्यक्ष ॲड. करूणा विमल यांना पुण्यातील महात्मा फुले वाड्यात सन्मानित करण्यात आले.
मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ रंगकर्मी सुषमा देशपांडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध गीतकार मा. अरुण म्हात्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम यांनी इंडियन स्टुडंट कौन्सिलची भूमिका प्रस्तावनेतून व्यक्त केली. आपल्या एकपात्री अभिनयाने सावित्रीबाई फुले यांचे कार्य घराघरात पोहोचवणाऱ्या सुषमा देशपांडे यावेळी म्हणाल्या, राज्यभरातून सावित्रीच्या लेकी या पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या सर्व लेकींनी सावित्रीच्या कार्याचा वसा घेऊन जोमाने काम करण्याची काळाची गरज आहे. ॲड. करुणा विमल यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहता त्या या पुरस्काराच्या खऱ्या मानकरी आहेत. त्यांनी प्रबोधनाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गीतकार अरुण म्हात्रे यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध उंच माझा झोका या गीताची आठवण करून देत म्हणाले, प्रत्येक स्त्रीने स्वतःच आपल्या मर्यादेचे कुंपण ओलांडून आकाशाला गवसणी घातली पाहिजे. आणि त्यासाठी सावित्रीबाईंच्या नावाचा हा पुरस्कार त्यांना कार्य करण्यासाठी सतत प्रेरणा देत राहील. ॲड. करुणा विमल यांचे महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोलाचे योगदान राहिले असून त्या सतत त्यांच्यात आत्मभान निर्माण करण्यासाठी काम करताना दिसतात.
याप्रसंगी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, डॉ. सुरेंद्र पाटील, अभिनेत्री विभावरी देशपांडे, डॉ. जगन्नाथ गोपाळ यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी अस्मिता चांदणे, माधुरी राऊत, धनाजी थोरे, डॉ. रोहित गायकवाड, डॉ. मीता रामटेके, आरती खातू, सारिका शिंदे ,सुवर्णा शिंदे यांच्यासह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या