प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 19 : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'रयतेच्या राजाला' आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानाचा मुजरा करण्यात आला. जिल्हा परिषद ते मारुती चौक या मार्गावर काढण्यात आलेल्या भव्य 'मेगा पदयात्रे'ने सांगली नगरी शिवमय झाली होती. "जय शिवाजी, जय भवानी" अशा घोषणा आणि लेझीमच्या तालावर निघालेल्या या पदयात्रेत प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
*प्रशासकीय अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
पदयात्रेचा प्रारंभ जिल्हा परिषद येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा परिषद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे, तहसिलदार लीना खरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, सर्वच अधिकाऱ्यांनी पदयात्रेत चालत सहभाग नोंदवून शिवरायांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.
*शिवकालीन युद्धकलांनी वेधले लक्ष*
पदयात्रा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी सादर केलेली मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके आकर्षणाचे केंद्र ठरली. तलवारबाजी आणि लाठी-काठी: विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या चपळाईने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मल्लखांब आणि लेझीम: पारंपरिक वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी लेझीमचा ताल धरला, तर मल्लखांबावरील कसरतींनी सर्वांना थक्क केले. शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या पोवाड्यांनी वातावरणात वीररस भरला.
*पारंपरिक वेशभूषा आणि बाल शिवबा-जिजाऊ*
या पदयात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले नागरिक आणि विद्यार्थी. अनेक बालकांनी 'प्रतिकात्मक बाल शिवबा' आणि 'बाल जिजाऊ' यांचे रूप साकारले होते.
*असा होता पदयात्रेचा मार्ग*
जिल्हा परिषद येथून निघालेली ही पदयात्रा राम मंदिर चौक, स्टेशन चौक आणि राजवाडा चौक मार्गे मार्गक्रमण करत मारुती चौक सांगली येथे पोहोचली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास जिल्हाधिकारी व इतर विभागप्रमुखांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले आणि पदयात्रेची सांगता झाली.
पदयात्रेस विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध शाळांचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या