प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:कृषि उत्पन्न बाजार समिती, तासगांव येथे गुरुवार दिनांक १९/०२/२०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता बाजार आवारातील सेलहॉलमध्ये नविन बेदाणा मालाच्या सौद्यांचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला.शुभारंभानंतर पहिल्याच दिवशी १८ आडत व्यापाऱ्यांकडे नविन बेदाणा मालाची आवक होऊन एकूण ८६७० बॉक्स (१३ गाड्या) इतकी विक्री झाली. हिरव्या बेदाण्यास ३३० ते ४११ रुपये,तर पिवळ्या बेदाण्यास ३२५ ते ३८७ रुपये असा दर मिळाल्याची माहिती सभापती युवराजदादा उर्फ सुनिल भानुदास पाटील यांनी दिली. दुपारी २.०० नंतर ३९ आडत व्यापाऱ्यांचे नियमित बेदाणा सौदेही सुरू झाले.
आजच्या सौद्यात भूपाल पाटील यांच्या में.धारेश्वर ट्रेडिंग कंपनी या दुकानात सोन्याळ (ता. जत, जि. सांगली) येथील शेतकरी अनिल आण्णाराय बिराजदार यांच्या AAB दर्जाच्या ४१ बॉक्स मालास ४११ रुपये असा उच्चांकी दर मिळाला.हा माल के.एम.ॲग्रोटेक चे तुषार शहा यांनी खरेदी केला.नविन बेदाणा मालाचा शुभारंभ सभापती युवराजदादा उर्फ सुनिल भानुदास पाटील,उपसभापती रामचंद्र सत्तु जाधव,संचालक धनाजी नारायण पाटील तसेच व्यापारी संचालक सुदाम लक्ष्मण माळी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बाजार आवारातील सर्व आडते,खरेदीदार व्यापारी,तसेच महाराष्ट्र,कर्नाटक व इतर राज्यांतील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सभापती युवराजदादा उर्फ सुनिल भानुदास पाटील,उपसभापती रामचंद्र सत्तु जाधव व प्रभारी सचिव रविंद्र बापू माने यांनी बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले की,आपल्या मालाला योग्य व स्पर्धात्मक दर मिळण्यासाठी तासगांव बाजार आवारातील अधिकृत सौद्यामधूनच बेदाण्याची विक्री करावी.नव्या हंगामाच्या प्रारंभीच मोठी आवक आणि समाधानकारक दर मिळाल्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या