प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : जीवनाच्या प्रवासात खडतर परीक्षा सहन केलेल्या, निराधार आणि समाजाच्या कडेला ढकलल्या गेलेल्या महिलांच्या आयुष्यात नवी उमेद आणि आत्मविश्वास निर्माण करणारा उपक्रम मिरज येथे राबविण्यात आला. सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका अंतर्गत कार्यरत ‘आस्था’ बेघर महिला निवारा केंद्र आणि ‘विहान (समग्र) केअर अँड सपोर्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने बेघर व पीडित महिलांसाठी ‘आनंद सहल’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
“जखमी मनांना माणुसकीची फुंकर” देणारा हा उपक्रम भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा व दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्थेच्या अध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या सौजन्याने साकार झाला. दुःख आणि वेदनेच्या सावलीत जगणाऱ्या महिलांना “आम्ही एकटे नाही” हा विश्वास देणे आणि त्यांच्या आयुष्यात आत्मसन्मानाची नवी पहाट उजाडणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा शेख यांनी, “स्वातीताई खाडे यांच्यासारख्या सामाजिक भान जपणाऱ्या नेतृत्वाकडून समाजाने प्रेरणा घेणे काळाची गरज आहे,” असे गौरवोद्गार काढले.
ही सहल सांगली येथून निघून जोतिबा – पन्हाळा – कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर आणि पुन्हा सांगली अशा मार्गावर यशस्वीरीत्या पार पडली. सहलीच्या शुभारंभप्रसंगी श्रीफळ वाढवून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. महिलांना शुभेच्छा देण्यासाठी व प्रोत्साहनासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी स्वातीताई सुशांत खाडे (अध्यक्षा, दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था), ज्योती सरवदे (प्रकल्प व्यवस्थापक, मनपा), डॉ. विनायक पाटील (वैद्यकीय अधिकारी), प्रमोद माळी, चंद्रकांत पाटील, मनीषा माळी, विनोद कदम, सुरेखा कदम, योगेश रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते. या सहलीचे उत्कृष्ट नियोजन शाहीन शेख आणि सुरेखा शेख या दाम्पत्याने केले.
‘आनंद सहल’ ही केवळ एक दिवसाची सहल न राहता, तुटलेल्या स्वप्नांना नवे पंख देणारी आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक प्रेरणादायी सामाजिक चळवळ ठरली आहे. दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्थेच्या भक्कम पाठबळामुळे या महिलांना सन्मानाने जगण्याचा नवा मार्ग मिळाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या