प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जिथे नाळ पुरलेली असते, त्याच मातीतून आकाशाला गवसणी घालण्याचे बळ मिळणे हे अहोभाग्य असते. शांतीनिकेतनच्या संस्कारभूमीत हे भाग्य अनेक गरीब वंचित विद्यार्थ्यांना मिळाल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार श्री. उत्तम कांबळे यांनी केले .शांतिनिकेतन येथे आयोजित माई पुरस्कार 2026 व गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या प्रमुख अतिथी पदावरून ते बोलत होते.
स्व. प्रा.डॉ.पी.बी .पाटील सोशल फोरम, नवभारत शिक्षण मंडळ आणि शांतीनिकेतन लोकविद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक संचालिका प्रा. सौ .सरोजताई पाटील (माई) यांचा 13वा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने माई पुरस्कार व गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना उत्तम कांबळे यांनी शांतिनिकेतन व त्यांच्या विद्यार्थी दशेतील काही आठवणींना उजाळा दिला. शांतीनिकेतन ही संस्था पिल्लांच्या चोचींना चारा व पंखांना बळ देणारी संस्था असल्याचे सांगितले. गुरुमाऊली व वडीलगुरु या रूपात भेटणाऱ्या स्व. पी. बी. पाटील साहेब व स्व. माई यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जाणारी व्यवस्था ही केवळ अन्न, पाणी देणारी व्यवस्था नसून; अखंड स्त्रोत असणारी ऊर्जा देणारी शिक्षण व्यवस्था असल्याचे ते म्हणाले . शांतिनिकेतन लोकविद्यापीठ हे आत्मनिर्भर ,स्वावलंबी माणूस व नवा समाज निर्माण करणारे विद्यापीठ असल्याचे सूतोवाच त्यांनी केले .
2026 सालचा माई पुरस्कार जेष्ठ माजी शिक्षिका श्रीमती . रजनी हिंदुराव पवार व शांतिनिकेतन विद्यामंदिरचे कर्मचारी श्री .सुनील विश्वनाथ पाटील यांना देण्यात आला. तर प्रसिद्ध उद्योजक व श्री .हरिभाऊ नागेंद्र गुरव यांना गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी 51 हजार रुपये रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. मानपत्र वाचन अनिकेत शिंदे व उपसंचालक डी .एस .माने यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ.नंदिनी पांडुरंग पाटील यांनी केले. संस्थेचे संचालक गौतमभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्याप्रसंगी महिला पालकांचा मेळावा व मनोरंजनात्मक कार्यक्रमही घेण्यात आला. हजारो महिला पालकांनी या कार्यक्रमात सहभागी होत आनंद घेतला. हर्षा बागल व तेजस्वी माळी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . संस्थेचे विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ व सल्लागार मंडळाचे सदस्य माजी विद्यार्थी परिवार , संस्थेच्या विविध शाखांचे शाला समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या