प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील संत निरंकारी मिशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ जल–स्वच्छ मन’ या अभियानाचा चौथा टप्पा देशभरात उत्साहात पार पडला.सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९३० शहरांमध्ये १६०० हून अधिक ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.सुमारे १२ लाख स्वयंसेवकांनी या अभियानात सहभाग घेतला.
सांगली जिल्ह्यातील १७ शाखांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याची माहिती सांगली–सातारा झोनचे झोनल इन्चार्ज नंदकुमार झांबरे यांनी दिली.तासगाव शाखेच्या १०० हून अधिक निरंकारी भक्त व सेवादलाच्या स्वयंसेवकांनी कापूर ओढा परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेत नदीपात्रातील कचरा, प्लास्टिक व घाण काढून परिसर स्वच्छ व सुंदर केला.या उपक्रमाला तासगाव नगरपालिकेचे सहकार्य लाभले.हा उपक्रम केवळ पर्यावरण संवर्धनापुरता मर्यादित नसून अध्यात्म,सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम ठरला. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या पुढाकाराने,बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.दिल्लीतील बुराडी येथे आयोजित विशेष सत्संग कार्यक्रमात सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की,खरी श्रद्धांजली शब्दांनी नव्हे तर कृतीतून अर्पण केली जाते. प्रेम, सेवा, करुणा आणि समदृष्टी यांसारख्या मूल्यांचा अंगीकार करूनच समाजपरिवर्तन शक्य आहे.स्वच्छता अभियानानंतर तासगावातही विशाल सत्संगाचे आयोजन करण्यात आले.बाह्य स्वच्छतेबरोबरच मनाची आंतरिक शुद्धता राखण्याचा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.तासगावात पार पडलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण-जागृतीसोबतच सामाजिक ऐक्य आणि सेवाभाव अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या