प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : येत्या ३ मार्चला आपल्याकडे चंद्रग्रहण आहे.समाजामधील ग्रहणाविषयीची भीती कमी करण्यासाठी सांगलीतील वैद्यकीय व्यवसायिकांच्या संघटनानी एक अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे. त्या अंतर्गत त्यांनी आज सर्व दवाखान्यात लावण्यासाठी एक चित्ररूपी प्रबोधन पोस्टरचे अनावरण घाटगे हॉस्पिटल सांगली येथे केले.
याप्रसंगी स्त्री रोग तज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. शर्वरी जाधव आणि सेक्रेटरी डॉ. निशा हळिंगळे म्हणाल्या की, येत्या 3 मार्च रोजी जे चंद्रग्रहण आहे त्यानिमित्ताने सकाळपासूनच वेध लागणार म्हणून ग्रहण पाळण्यासाठी गरोदर महिलांवर अनेक बंधने घातली जात आहेत ती अत्यंत चुकीची आहेत.
प्रसिद्ध स्री रोग तज्ञ डॉ सोमशेखर पाटील म्हणाले की “ ग्रहण पाळणे” हेच बऱ्याच वेळेला धोकादायक ठरू शकते, कारण पोटात दुखू लागले तरी घराबाहेर पडायचे नाही. या गैरसमजातून गरोदर महिलेला ग्रहण सुटेपर्यंत घरीच थांबविले जाते. दवाखान्यात पाठवले जात नाही. त्यातून अतिरिक्त गुंतागुंतीची परिस्थिती तयार होते. ज्यात बाळाच्या किंवा मातेच्या जीवाला धोका निर्माण होतो, अशी उदाहरणे प्रत्येक ग्रहणाच्या वेळेस घडताना वारंवार दिसत असतात.
बालरोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. शरद घाडगे म्हणाले की, बाळांचे जन्मजात ओठ फाटणे किंवा तत्सम गर्भाचे व्यंग हे जनुकीय किंवा गुणसूत्रांच्या दोषांमुळे आणि फॉलिक ऍसिड, विटामिन बी 12 यासारख्या अन्न घटकांच्या कमतरतेमुळे किंवा काही औषधांमुळे होत असताना दिसतात. पण ग्रहणांमुळे कोणतेही दुष्परिणाम गर्भावर होताना अनुभवाला येत नाहीत.
बालरोग तज्ञ संघटनेच्या सेक्रेटरी डॉ. शर्मिला देशपांडे म्हणाल्या की, ग्रहणकाळात गरोदर मातेने चाकू, कात्री वापरली म्हणून बाळाचे ओठ फाटतात किंवा पायावर पाय ठेवून बसले म्हणून बोटे चिकटतात असे काही होत नसते. या सर्व गैरसमजूती आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ. सुमंत कुलकर्णी म्हणाले की, गरोदर महिलांच्या सोनोग्राफी,डबल मार्कर्स सारख्या रक्त तपासण्या आणि जरूर पडल्यास गर्भजलाच्या जनुकीय चाचण्या करून गर्भ चांगला आहे की नाही हे डॅाक्टर पहात असतात. त्यामुळे आता जन्मजात दोषांचे प्रमाण कमी झाले आहे , सर्वांनी या विषयी डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे. तसेच गरोदर राहण्यापूर्वीपासून फोलेट व विटॅमिन बी १२ खावे हे फार महत्त्वाचे आहे.
खगोल अभ्यासक आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. संजय निटवे म्हणाले की, ग्रहण ही सावल्यांच्यामुळे निर्माण होणारी खगोलीय घटना आहे. ग्रहणा वेळी कोणतेही नवीन किरण अथवा ऊर्जा तयार होत नसते.
इंडियन मेडिकल असोसिएशन च्या महिला विभाग संघटनेच्या आणि जनरल प्रॅक्टिशनर फोरम व हिंपा या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रबोधन उपक्रमास पाठिंबा दिला आहे. त्यांनीही आवाहन केले आहे त्या दिवशी गरोदर महिला सर्व कामे करू शकतात, बाहेर फिरणे हे धोक्याचे नसते.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, ग्रहण अशुभ नसते, तर ती एक सुंदर खगोलीय घटना असते. तेव्हा चंद्रग्रहण पाहून या खगोलीय घटनेचा आनंद घ्या. ग्रहणाविषयी
समाजमाध्यमातून येत असलेल्या चुकीच्या मेसेज वर ,माहितीवर विश्वास ठेवू नये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून कोणताही मानसिक ताण तणाव घेऊ नये. सांगली जिल्ह्यातील स्त्री रोग तज्ञ संघटना आणि बालरोग तज्ञ संघटनेने गरोदर महिलांसाठी ग्रहणाविषयी प्रबोधन मोहीम हाती घेतली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
अंनिसच्या गीता ठाकर म्हणाल्या की,कोणत्याही सुधारलेल्या देशांमध्ये ग्रहणांविषयी आपल्यासारखा बाऊ केला जात नाही हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे.
डॉ. घाटगे यांच्या विजयसिंह राजे पटवर्धन सभागृहात हॅास्पीटल मध्ये हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी अंनिस सांगली शाखेचे पदाधिकारी राहुल थोरात, डॉ. संजय निटवे,त्रिशला शहा, प्रा. अमित ठाकर, गीता ठाकर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या