प्रतिष्ठा न्यूज
हातकणंगले प्रतिनिधी : १४ फेब्रुवारी म्हटले की गुलाब, शुभेच्छा आणि सोशल मीडियावरील पोस्ट्स यांचीच चर्चा होते. मात्र Hatkanangale येथे या दिवशी प्रेमाची वेगळीच व्याख्या अनुभवायला मिळाली. ‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘रोटी डे’ साजरा करत गरजू, अनाथ आणि उपेक्षितांसाठी अन्नधान्य संकलनाचा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
आय एम कलाम फौंडेशन, मा. श्री. अण्णासाहेब डांगे महाविद्यालयचा राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व सांस्कृतिक विभाग तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला. २०१८ पासून सुरू असलेला ‘रोटी डे’ यंदा नवव्या वर्षात दाखल झाला आहे.
सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत महाविद्यालय परिसरात मदत संकलन मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अन्नधान्य, बिस्कीट, शैक्षणिक साहित्य आदी वस्तू जमा केल्या. पहिल्याच दिवशी १५० किलो तांदूळ, ५० किलो गहू, ६० किलो ज्वारी, १० किलो गहू पीठ, १६० बिस्कीट पुडे तसेच शैक्षणिक साहित्य संकलित झाले. नागरिकांच्या विनंतीनुसार मदत संकलन १६ व १७ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आले.
संकलित साहित्य खोतवाडी येथील राजहंस फौंडेशन संचलित ‘मायेची सावली’ या मुलींच्या अनाथाश्रमात सुपूर्द करण्यात आले. यावेळी डॉ. पहिलवान मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला.
*उपस्थित मान्यवर*
उपक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. निरंजन कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रा. डॉ. मोहन सावंत (सांस्कृतिक विभाग प्रमुख), प्रा. डॉ. अमोल महाजन (एनएसएस विभाग प्रमुख), प्रा. डॉ. समीर गायकवाड, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. शुभम पोतदार, प्रा. सुधा नलवडे, प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रल्हाद भिमराव शिरगावे, माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. दिलीप आनंदराव शिरसट उपस्थित होते.
अनाथाश्रम भेटीदरम्यान आय एम कलाम फौंडेशनचे अनिस मुजावर, अक्षय कोठावळे, ऋषिकेश नानगुरे, शिवराज कुण्णूरे, अमन आवळे, अनिकेत येणपे, हर्षवर्धन परिट, मनोज पोवार, सुशांत कोडग, प्रणाली गोदणे तसेच सुधीर गायकवाड आदी उपस्थित होते.
उपक्रमाचे संकल्पक अनिस मुजावर म्हणाले, “प्रेम व्यक्त करण्याचा खरा मार्ग म्हणजे गरजूंना आधार देणे. ‘रोटी डे’ हा केवळ उपक्रम नसून संवेदनशील समाज घडवण्याची चळवळ आहे.”
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी ‘१४ फेब्रुवारी म्हणजे रोटी डे’ असा संदेश देत धान्य व साहित्य संकलनात सक्रिय सहभाग नोंदवला. पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.
फुलांऐवजी अन्नधान्याची भेट देत हातकणंगलेकरांनी प्रेमाचा अर्थ अधिक व्यापक केला आहे. ‘रोटी डे’मधून समाजातील उपेक्षितांप्रती असलेली संवेदनशीलता पुन्हा अधोरेखित झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या