प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:कोणतीही करवाढ न करता नगरपरिषदेचा सन २०२५-२६ चा ६३ कोटी २९ लाख १४ हजार ८४७ रुपयांचा सुधारीत तर सन २०२६-२७ चा ८० कोटी ४० लाख ५० हजार ९४ रुपयांचा अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला.३ लाख ८७ हजार ४३१ रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पाला बहुमताने मंजुरी देण्यात आली.मात्र विषयपत्रिके बाहेरील चर्चेवरून काका-दादा गटात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. सभा संपण्यापूर्वीच दादा गटाच्या नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर पडण्याचा पवित्रा घेतला.नगराध्यक्षा सौ.विजया बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांच्या आदेशाने लेखापाल शहाबाज शेख यांनी अर्थसंकल्प सादर केला.सभेच्या सुरुवातीलाच दादा गटाचे नगरसेवक अरुण साळुंखे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल व भाजी मार्केटमधील गाळ्यांच्या डिपॉझिटची शिल्लक आणि परताव्याबाबत प्रश्न उपस्थित केला.त्यावर नगराध्यक्षा सौ पाटील यांनी प्रशासनाला सूचना दिल्या असून माहिती लवकरच देण्यात येईल,तसेच कोणावरही अन्याय होणार नाही,गरीबांना न्याय दिला जाईल,असे स्पष्ट केले.या विषयावर नगरसेवक संतोष बेले सतिश लिंबळे, व अनिल कुत्ते यांनीही मते मांडली.यावेळी अॅड.तुकाराम कुंभार यांनी अर्थसंकल्पातील आकडेवारी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत स्पष्ट करावी,तसेच पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी ठोस नियोजन काय आहे,असा सवाल उपस्थित केला.त्यावर मुख्याधिकारी लेंडवे यांनी पालिका वसुली मोहिमेला प्राधान्य देत असल्याचे सांगितले.
सभागृहाचे पावित्र्य राखण्याचा इशारा..
सभेदरम्यान टेबल वाजवणे किंवा अनुचित वर्तन सहन केले जाणार नाही,असे स्पष्ट करत नगराध्यक्षा सौ विजया पाटील यांनी सभागृहाचे पावित्र्य राखण्याचे आवाहन केले.घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीच्या कामात अडथळा आणू नये,असेही त्यांनी बजावले.
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
नगरपरिषदेचे स्वतःचे उत्पन्न : ११ कोटी ८४ लाख ७७ हजार ३२२ रुपये
सन २०२५-२६ महसुली खर्च : ३० कोटी ८३ लाख ९८ हजार ८८० रुपये
२०२५-२६ सुधारीत खर्च : ५८ कोटी ८१ लाख १६ हजार ७७९ रुपये
सन २०२६-२७ अपेक्षित खर्च : ८० कोटी ३६ लाख ६२ हजार ६६३ रुपये
आरंभीची शिल्लक : ४ कोटी ४७ लाख ९८ हजार ६८ रुपये
अखेरची शिल्लक : ३ लाख ८७ हजार ४३१ रुपये
सामाजिक योजनांना प्राधान्य
Pradhan Mantri Awas Yojana साठी ४ कोटींची तरतूद
अंध व अपंग कल्याणासाठी १५ लाख रुपये
नागरी महिला व बालकल्याण योजनांसाठी १५ लाख रुपये..
या सभेला नगरसेवक संतोष बेले अनिल कुत्ते,सतिश लिंबळे,सचिन भाट,संदीप सावंत,विशाल शिंदे, अॅड.तुकाराम कुंभार,अहमदसो मुजावर,अरुण साळुंखे,सुशिला जाधव आदी उपस्थित होते.
एकूणच करवाढ टाळून मोठ्या आकाराचा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याने सत्ताधारी गटाने समाधान व्यक्त केले,तर विरोधकांनी आर्थिक शिस्त व उत्पन्नवाढीबाबत ठोस कृती आराखडा सादर करण्याची मागणी केली.सभेतील राजकीय तापमान मात्र अर्थसंकल्पाइतकेच वाढलेले दिसून आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या