प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: कडक उन्हाळ्यामुळे पूर्णपणे कोरड्या पडलेल्या अग्रणी नदीपात्रात अखेर जलधारा वाहू लागल्या असून, सावळज परिसरातील धोक्यात आलेल्या द्राक्ष बागांना मोठा दिलासा मिळाला आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत पाणी सोडले.यासाठी नूतन पंचायत समिती सदस्य ऋषिकेश बिरणे यांच्या प्रयत्नांनाही यश मिळाले.
सावळज पूर्व भागाची जीवनवाहिनी असलेली अग्रणी नदी उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पूर्णपणे कोरडी पडली होती. द्राक्ष हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना बागांना पाण्याची नितांत गरज निर्माण झाली होती. वर्षभराचे कष्ट आणि लाखो रुपयांची गुंतवणूक पाण्याअभावी वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत होते.
या गंभीर परिस्थितीची जाणीव होताच ऋषिकेश बिरणे, सावळजसिद्ध विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ यांनी संजयकाका पाटील यांची भेट घेऊन कैफियत मांडली.परिस्थितीची दखल घेत संजयकाका पाटील यांनी तातडीने सांगली येथील मुख्य पाटबंधारे विभागात अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली.बागा वाचवण्यासाठी पाणी सोडणे किती अत्यावश्यक आहे, हे त्यांनी प्रशासनाला पटवून दिले.त्यांच्या आक्रमक व ठाम भूमिकेमुळे अखेर निर्णयाला गती मिळाली.या प्रक्रियेत तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी शंभर वर्षांची परंपरा जपणाऱ्या ‘सावळजसिद्ध’ सोसायटीने पुढाकार घेत आवश्यक रक्कम तातडीने भरली.केवळ कर्जपुरवठा न करता संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आपली बांधिलकी सोसायटीने पुन्हा एकदा सिद्ध केली.
संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सिद्धेवाडी तलावाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून,याचा थेट फायदा सिद्धेवाडी, बसवेश्वरवाडी आणि सावळज परिसरातील हजारो एकर द्राक्ष बागांना होणार आहे. उन्हाळ्याच्या कडाक्यात हक्काचे पाणी मिळाल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
"द्राक्ष बागायतदार होरपळत असताना माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आमची हाक ऐकली आणि तातडीने पाटबंधारे विभागाची बैठक घेऊन अग्रणी पात्रात पाणी सोडले. काकांच्या तत्परतेमुळे आणि सावळजसिद्ध सोसायटीच्या बांधिलकीमुळे हजारो एकर बागांना जीवदान मिळाले आहे. बळीराजाच्या वतीने मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो."
— ऋषिकेश बिरणे, सदस्य, सावळज पंचायत समिती
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या