प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रसाराचा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणामहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कुसुमाग्रज यांच्या जीवनावर आधारित भित्तिपत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले.कार्यक्रमासाठी विविध शाळांतील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये श्री.वि.ऊ.बा. पटवर्धन कन्या प्रशाला, तासगाव येथील राणी अण्णाराव कडकधोंड, महावीर पांडुरंग साळुंखे हायस्कूल मनेराजुरी येथील दीपक रामचंद्र मगदूम तसेच गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळा, तासगाव येथील सतीश कृष्णा जाधव यांनी स्पर्धकांसह उपस्थिती दर्शविली. पालक प्रतिनिधी म्हणून संगीता माळी व सुनीता जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. हस्ताक्षर स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व, साहित्यिकांचा वारसा व मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य यावर प्रभावी मते मांडली. हस्ताक्षर स्पर्धेत स्वच्छ व सुबक अक्षरांचे उत्कृष्ट नमुने पाहायला मिळाले, तर प्रश्नमंजुषेत मराठी भाषा, व्याकरण, साहित्य व सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक संकल्पनांची आकर्षक मॉडेल्स सादर करून वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला.पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. एल. व्ही. भंडारे मॅडम यांनी मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून आपल्या संस्कृतीचा आत्मा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. पाटील यांची प्रेरणा लाभली. कार्यक्रमास डॉ. देवदत्त खजूरकर, डॉ. अर्चना चिखलीकर, प्रा. अंकुश पंडित, प्रा. प्रमोद शेंडगे तसेच श्री. संजय कुंभार, श्री. हणमंत वाघमारे व सौ. अस्मिता साळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी मोरे व अवंतिका कुंभार यांनी केले,तर आभार प्रदर्शन अनुराधा पवार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘पसायदान’ने झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या