प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 12 : पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परळी वैजनाथ येथे होणारे 'अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो २०२६ हे प्रदर्शन देशातील जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम असणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालक, तरुण उद्योजक आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट देऊन आपले ज्ञान व उत्पन्न वाढवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक 'अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो, २०२६ प्रदर्शनाच्या अधिकृत लोगोचे अनावरण आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. अजयनाथ थोरे व इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान जिल्हा परिषद येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्तेही 'अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो, २०२६ प्रदर्शनाच्या अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व पशुपालक बांधवांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
या प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. अजयनाथ थोरे म्हणाले, या प्रदर्शनात राज्यातील व राज्याबाहेरील जातीवंत गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या आणि पक्ष्यांच्या विविध प्रजातींचे दर्शन घडणार आहे. आधुनिक डेअरी फार्मिंग, चारा नियोजन आणि प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स असणार आहेत. पशुधनाचे आरोग्य, लसीकरण आणि वैज्ञानिक संगोपन यावर तज्ज्ञ पशुवैद्यकांची विशेष व्याख्याने आयोजित केली आहेत. जिल्ह्यात प्रदर्शनाची व्यापक प्रसिद्धी मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्था, पंचायत समिती आणि सार्वजनिक ठिकाणी बॅनर व पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही 'घरपोच माहिती देण्याचे नियोजन विभागाने केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या