प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : भंडारा तालुक्यातील फुलमोगरा अशोकनगर येथे आयोजित भीमगीतांच्या कार्यक्रमादरम्यान गायिका अंजली भारती हिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत केलेल्या कथित प्रक्षोभक व बदनामीकारक वक्तव्याचा भाजपा महिला मोर्चातर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमात राज्याच्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीच्या कुटुंबीयांविषयी सार्वजनिक व्यासपीठावरून अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन लज्जास्पद शब्दप्रयोग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका महिलेबद्दल अशा प्रकारचे असभ्य वक्तव्य करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नसल्याचे मत भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
या प्रकरणात संबंधित गायिकेविरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकृत तक्रार दाखल करण्यात यावी. यासाठी सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विश्रामबाग सांगली पोलीस स्टेशन (SP ऑफिस) येथे पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी महिलांचा सन्मान व प्रतिष्ठा अबाधित राहावी यासाठी अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे गरजेचे असून, भाजपा महिला मोर्चा याबाबत ठाम भूमिका घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अनिताताई हारगे ,कपिलाताई पाटील, माधुरीताई वसगडेकर गंगुताई नाईक, कांबळेताई , अरुणाताई बाबर गायत्रीताई सातपुते आदी उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या