प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. १७ : सुंदर आकाराच्या रांगोळ्या, मंद शांत संगीताची धून, संधिकालचा हवाहवासा गारवा आणि रंगलेली काव्यमैफल.. हा मन खूश करणारा माहोल सजला होता मोतीबागेत म्हणजेच जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या निवासस्थानी. निमित्त होतं शुक्रवारच्या सायंकाळी रंगलेल्या कृष्णाकाठचा साहित्य मेळावा : ‘साहित्यिकांची मांदियाळी’ या अनौपचारिक कार्यक्रमाचं.
मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने साधलेल्या या कृष्णाकाठच्या साहित्य मेळ्याच्या केंद्रस्थानी होत्या साक्षात अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष प्रा. डॉ. तारा भवाळकर. जिल्हाधिकारी अशोक काकडे व त्यांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे यांच्याबरोबरच सोलापूरच्या साहित्य क्षेत्रात गेली अनेक वर्ष योगदान देणाऱ्या मनोरमा साहित्य संमेलनाचे संयोजक श्रीकांतराव मोरे व शोभा मोरे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. आभाळमाया फाऊंडेशनचे सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी या देखण्या संयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. पत्रकार संदीप काळे हेही उपस्थित होते.
यावेळी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून साहित्यविश्वात मानाचा ठसा उमटवून सांगलीचा गौरव वृद्धिंगत केल्याबद्दल डॉ. तारा भवाळकर यांचा सन्मान सांगलीकरांच्या वतीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केला. यावेळी प्रशासकीय वातावरणात साहित्यिक उपक्रम होत असल्याबद्दल अपूर्वाई व्यक्त करत प्रा. डॉ. तारा भवाळकर यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात नवीन पिढीने केलेले कौतुक आदराचे वाटते, अशा हृद्य भावना व्यक्त केल्या. तसेच साहित्य साधनेसाठी दक्षिण भारतात गेल्यानंतर आलेले अनुभव कथन करून अवडक चवडक या त्यांच्या कथासंग्रहातील कविताही सादर केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, प्रा. डॉ. तारा भवाळकर यांच्या दीर्घकालीन साहित्यसेवेने मराठी साहित्यविश्वात विचारांची, संवेदनांची आणि मूल्यांची रुजवण केली आहे. स्त्री-अनुभव, सामाजिक वास्तव आणि मानवी नातेसंबंध यांचे सूक्ष्म दर्शन त्यांच्या लेखनातून घडते. मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने त्यांच्या या साहित्यिक योगदानाचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, साहित्य हे समाजाचे आत्मभान जागृत करणारे माध्यम आहे. त्या आत्मभानाला व्यासपीठ देण्याचा हा छोटा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमात मनोरमा साहित्य संमेलन, सोलापूर–२०२५ या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेत विविध लेखक, कवी व समीक्षकांच्या लेखनातून साहित्यप्रवाहाचा धांडोळा घेण्यात आला आहे. यावेळी श्रीकांतराव मोरे व शोभा मोरे यांनी मनोरमा साहित्य संमेलननिमित्त गेल्या अनेक वर्षातील साहित्य क्षेत्रातील आठवणी जागृत केल्या.
जिल्हाधिकारी अशोक काकडे व त्यांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे रंगलेली काव्यमैफल. डॉ. अनिल मडके, सुहास पंडित, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, भीमराव धुळुबुळू, प्रा. संजय ठिगळे, अभिजीत पाटील, महेश कराडकर, विठ्ठल मोहिते, वर्षा चौगुले, लता ऐवळे, वैष्णवी जाधव, दीपाली घाडगे, रमजान मुल्ला, नाईकबा गिड्डे, चिंतामणी सहस्रबुद्धे, अशोकराव घोरपडे, संदीप काळे, तहसीलदार शामला खोत, मनिषा पाटील अशा अनेक अनुभवी आणि नव्या पिढीतील कवींनी यावेळी यांनी आपल्या कविता सादर करून रंगत आणली. विशेष म्हणजे खुद्द जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे व त्यांचे चिरंजीव यांनीही यावेळी कविता सादर केल्या. या कवितांतून प्रेम, निसर्ग, संघर्ष, स्त्री-अस्मिता, माणूसपण व सद्यकालीन परिस्थिती आदि भावनांना वाट मिळाली.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह यांच्यासह साहित्यिक, कवी, अभ्यासक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार लीना खरात यांनी सूत्रसंचालन केले. कवितावाचनाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष काळे यांनी केले. एकूणच सांगली जिल्ह्याच्या साहित्यिक परंपरेला चालना देत या साहित्य मेळ्याने जिल्ह्यातील साहित्यिकांनाही नवे बळ दिले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या