प्रतिष्ठा न्यूज
प्रतिनिधी (कोल्हापूर) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतीय स्त्रियांच्या विकासासाठी खूप मोलाचे योगदान दिल आहे. जात आणि धर्माच्या प्रभावामुळे शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या स्त्रियांना सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना प्रगतीची दारे उघडी केल्याचे आपल्याला दिसून येते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षिका नव्हे तर त्या एक उत्तम कवयित्री, समाजसेविका होत्या. त्यांना महिलांच्या मुक्तिदात्या असेही म्हटले जाते. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी शिक्षणाबरोबर समाजसेवेमध्ये सुद्धा खूप मोठी कामगिरी केली आहे. सावित्रीबाई फुले यांचे कार्य आजही समाजाला दिशादर्शक आहे असे प्रतिपादन कोल्हापुरातील आदर्श शिक्षिका शर्मिला शानेदिवाण यांनी केले.
त्या डॉ. शोभा चाळके लिखित 'सावित्रीबाई फुले : व्यक्ती आणि विचार' या पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी सुप्रसिद्ध लेखक व समीक्षक प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे भारतीय समाज सुधारणेमध्ये दीपस्तंभासारखे काम आहे. त्यांनी शिक्षणासह सामाजिक क्षेत्रात अतिशय क्रांतिकारी कार्य केले आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले हे भारतीय इतिहासातील सोनेरी पान आहेत.
डॉ. शोभा चाळके यांनी पुस्तक लिहिल्या पाठीमागील भूमिका विशद केली. डॉ. स्वप्निल बुचडे, आदित्य म्हमाने, अॅड. अधिक चाळके, अभिजीत मासुर्लीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या