प्रतिष्ठा न्यूज/ सांगली प्रतिनिधी
28 डिसेंबर, 2025: सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन सान्रिध्यात महाराष्ट्राचा 59वा वार्षिक निरंकारी संत समागम भव्यदिव्य स्वरुपात दिनांक 24, 25 व 26 जानेवारी, 2026 रोजी सांगली ईश्वरपुर रोड, प्रकाश ॲग्रो समोर, लोकरे पेट्रोल पंपा नजिक, सांगलवाडी, सांगली (महाराष्ट्र) येथील विशाल मैदानांवर आयोजित करण्यात येत आहे. सत्याचा बोध प्राप्त करुन आत्ममंथन करत जीवनाची वास्तविकता जाणून मनुष्य जन्माच्या मुख्य उद्देशाकडे अग्रेसर होऊन विश्वामध्ये प्रेम, बंधुत्व, शांती व सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हे या समागमाचा मुख्य उद्देश आहे.
सुमारे 350 एकराच्या विशाल प्रांगणात आयोजित होत असलेल्या या भव्य आध्यात्मिक आयोजनाच्या तयारीसाठी स्वैच्छिक सेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मिशनच्या सेवादलाचे मुख्य संचालक श्री.एस.के.जुनेजा जी यांच्या शुभहस्ते फावड्याने मैदानावरील माती काढून करण्यात आला. या प्रेरणादायी समारोहाचा प्रारंभ सतगुरुंचा जयघोष व निराकार ईश्वराच्या प्रार्थनेने करण्यात आला. त्यानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित सेवादल स्वयंसेवकांद्वारे सतगुरु प्रार्थनेचे गायन करण्यात आले.
या प्रसंगी मिशनच्या प्रचार-प्रसार विभागाचे मेंबर इंचार्ज, आदरणीय श्री.मोहन छाब्रा जी, प्रचार विभागाचे समन्वयक श्री.हेमराज शर्मा, समागम समितीचे चेयरमन श्री शम्भुनाथ तिवारी, समन्वयक श्री नंदकुमार झांबरे, समितीचे अन्य सदस्य आणि महाराष्ट्रातील सर्व झोनल इंचार्ज, सर्व सेवादल क्षेत्रीय संचालक उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या हजारों निरंकारी भक्तगणांनीही या समारोहामध्ये भाग घेतला.
स्वेच्छा सेवांच्या उद्घाटन प्रसंगी आपले भाव व्यक्त करताना आदरणीय एस के जुनेजा जी म्हणाले, की हा संत समागम सांगली नगरीसाठी एक ऐतिहासिक क्षण बनून राहील. सेवादल स्वयंसेवकांनी समागम समितीच्या निर्देशानुसार खांद्याला खांदा लावून निरंतर सेवा करत या मैदानाला सुंदर रूप द्यावे आणि लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम व्यवस्था तयार करावी.
प्रचार प्रसार विभागाचे मेंबर इंचार्ज मोहन छाब्राजी यांनी समस्त मानवतेला संत समागमाच्या शुभकामना व्यक्त करताना सांगितले, की सतगुरु मानवमात्राचे कल्याण करण्यासाठी जगामध्ये प्रकट होत असतो. या संत समागमाद्वारे तोच दिव्य संदेश दिला जाणार आहे जो पुरातन काळापासून संत-महात्म्यांनी व गुरु-पीर-प्रेषितांनी मानवमात्राला दिला आहे. हा संत समागम समस्त मानवतेसाठी कल्याणकारी व्हावा आणि त्यामधील संदेशाने मानवाने वेळीच जागृत व्हावे व आपल्या जीवनाचे सार्थक करावे, असे ते शेवटी म्हणाले.
महाराष्ट्रात वार्षिक निरंकारी संत समागमांची परंपरा फार जुनी आहे. 1968 मध्ये महाराष्ट्राचा पहिला संत समागम मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला व त्यानंतर सतत 52 वर्षे हा संत समागम मुंबई महानगर प्रदेशातच होत राहिला. त्यानंतर सन 2020 मध्ये 53वा संत समागम नाशिक मध्ये झाला तर 56वा संत समागम छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आला. त्यानंतर 57वा संत समागम नागपुर नगरीत झाला आणि मागील वर्षी 59वा संत समागम आयोजित करण्याचे सौभाग्य विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे नगरीस लाभले. यावर्षीच्या समागमाचे आयोजन करण्याचे सौभाग्य सांगलीकरांना प्राप्त झाले आहे.
समालखा (हरियाणा) येथे आयोजित विश्वस्तरिय 78व्या वार्षिक निरंकारी संत समागमानंतर प्रतिवर्षाप्रमाणे प्रत्येक भक्त महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.
हा दिव्य संत समागम पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक व अन्य भक्तगण हजारोंच्या संख्येने मोठ्या श्रद्धेने समागम स्थळी येऊन तन्मयतेने समागमाच्या पूर्वतयारीसाठी आपल्या सेवा अर्पण करत राहतील.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या