संग्रामपूर प्रतिनिधी : वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून व २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त वन विभाग व _आदिवासी माध्यमिक विद्यालय, टुनकी_ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध जटाशंकर धबधबा परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत विद्यालयातील _स्काऊटचे १८, गाईडच्या ८, इको क्लबचे ११ व स्वच्छता दूताचे १०_ असे एकूण ४७ विद्यार्थी सहभागी झाले होते.
पर्यटकांकडून फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिक व कचऱ्यामुळे निसर्गाची होणारी हानी टाळण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आणि वन कर्मचाऱ्यांनी धबधब्याच्या आसपासचा परिसर, पायवाटा आणि जलप्रवाहातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व थर्माकोल गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना _वनपरिक्षेत्र अधिकारी सोनाळा अजय बावणे_ यांनी सांगितले की, पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांनी निसर्गाचे सौंदर्य जपले पाहिजे. प्लास्टिक कचऱ्यामुळे वन्यजीवांना व जलचरांना मोठा धोका निर्माण होतो. निसर्गाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
या मोहिमेत _गाईड कॅप्टन काळे मॅडम_ यांच्यासह कोकाटे मॅडम, नेमाडे सर, चांदूरकर सर, काकर सर, पवार सर, सुरत्ने सर, वनपाल, वनरक्षक व शिक्षकवृंद उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या