गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील विविध रस्ता डेव्हलपमेंट (विकास) प्रकल्पांसाठी जमिनी संपादित करताना संबंधित प्रशासनाकडून बाजाराभाव आणि शासकीय मूल्यांकनाचा कोणताही ताळमेळ न घालता अत्यंत तुटपुंजा मोबदला जाहीर करण्यात आल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून नोटिसांद्वारे जाहीर करण्यात आलेले दर म्हणजे शेतकऱ्यांची एकप्रकारे चेष्टाच असल्याचा आरोप करत, या अन्यायाविरुद्ध 'गगनबावडा तालुका शेतकरी बचाव कृती समिती'च्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.
या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी जय भवानी मंदिर, शेणवडे येथे बाधित शेतकरी बांधवांची महत्त्वपूर्ण विचार-विनिमय बैठक पार पडली.
बैठकीतील प्रमुख मागण्या व चर्चिलेले मुद्दे:
योग्य व रास्त मोबदला: बाधित जमिनींना चालू बाजारभावानुसार आणि प्रचलित कायद्यानुसार योग्य जमिनीचा मोबदला मिळावा.
अधिकृत मोजणी व माहिती: जमिनींची योग्य पद्धतीने पारदर्शक मोजणी करून संपादित जमिनीबाबतची अचूक आणि अधिकृत माहिती संबंधित शेतकऱ्यांना तत्काळ पुरवली जावी.
पूरपरिस्थिती व सुरक्षितता: उदाहरणार्थ, शेणवडे-गुरववाडी दरम्यान रस्त्याचा १५ फूट भराव केल्यामुळे आसपासच्या गावांना व वाड्यावस्त्यांना पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अशा स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊनच रस्ते विकासाचे नियोजन व्हावे.
शेतीचे रस्ते अबाधित ठेवणे: रस्ता विकासामुळे शेतकऱ्यांचे शेतात जाण्याचे हक्काचे रस्ते बंद होणार नाहीत, यासाठी पर्यायी रस्त्यांची स्पष्ट तरतूद करण्यात यावी.
प्रकाश पाटील यांचा बाधित शेतकऱ्यांना दिलासा व खंबीर पाठिंबा
गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवून त्यांना कायद्यानुसार त्यांचा न्याय्य हक्क आणि योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी गगनबावडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. प्रकाश पाटील (शेणवडे) यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रशासनाला जाब विचारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
"शेतकऱ्यांची जमीन हीच त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे. प्रशासनाने मनमानी कारभार करत शेतकऱ्यांवर अन्यायकारक दर लादण्याचा प्रयत्न केल्यास ते सहन केले जाणार नाही. तालुक्यातील प्रत्येक बाधित शेतकऱ्याला त्याचा कायदेशीर हक्क आणि योग्य मोबदला मिळेपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील."
— श्री. प्रकाश पाटील
(तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, गगनबावडा)
या लढ्यात तालुक्यातील सर्व शेतकरी, अभ्यासक व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले जात असून, बाधित शेतकरी बांधवांनी स्वतःच्या हक्कासाठी आणि शेतकरी हितासाठी संघटित व्हावे, असे आवाहन कृती समिती व स्थानिक नेत्यांकडून करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या