प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : द्राक्ष हंगामाच्या तोंडावर पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंतेत असलेल्या सावळज-सिद्धेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.आमदार रोहित पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पुणदी सिंचन योजनेतून बिरणवाडी वितरिकेद्वारे शुक्रवारी दुपारी अग्रणी नदीपात्रात पाणी दाखल झाले.नदीपात्रात पाणी पोहोचताच परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.द्राक्ष छाटणीचा हंगाम जवळ आल्याने पाण्याची उपलब्धता हा शेतकऱ्यांसमोरील महत्त्वाचा प्रश्न बनला होता.ही अडचण लक्षात घेऊन आमदार रोहित पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करत पुणदी योजनेतून सिद्धेवाडी तलाव तसेच अग्रणी नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती.त्यांच्या पाठपुराव्यानंतर बिरणवाडी वितरिकेतून पाणी सोडण्यात आले असून ते अग्रणी नदीपात्रात दाखल झाले आहे.अग्रणी नदीला पाणी आल्याने सावळज परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना छाटणी हंगामासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा आधार मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून पाण्याच्या प्रश्नामुळे निर्माण झालेली चिंता काही प्रमाणात दूर झाली असून आगामी द्राक्ष हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.नदीपात्रात पाणी दाखल झाल्याचे समजताच शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले.टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणांच्या गजरात त्यांनी आनंद व्यक्त केला.पाणीप्रश्नावरून विविध स्तरांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाही त्याला राजकीय उत्तर देण्यापेक्षा प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देण्यावर भर देऊन ‘विरोधकांच्या आरोपांना पाणी हेच उत्तर’ या भूमिकेतून प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिल्याचे आमदार रोहित पाटील यांनी स्पष्ट केले.दुष्काळजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणींचे राजकारण न करता त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून पाणी मागणीचे अर्ज अथवा पाणीपट्टीची मागणी करू नये, तसेच पाणीपट्टीची जबाबदारी आपण स्वतः स्वीकारण्याची भूमिका आमदार पाटील यांनी घेतली होती.त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविताना शेतकऱ्यांवरील आर्थिक भाराचाही विचार करण्यात आला.सावळज परिसरातील द्राक्ष उत्पादकांसाठी अग्रणी नदी ही महत्त्वाची जलवाहिनी आहे. द्राक्ष छाटणीच्या काळात पाण्याची उपलब्धता हंगामाच्या दृष्टीने निर्णायक ठरते. त्यामुळे नदीपात्रात पाणी दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. दुष्काळाच्या काळात आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व असून अग्रणी नदीपात्रात पोहोचलेले पाणी ही त्याचीच प्रचिती ठरल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या