प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क
सांगली : बोलण्याचा बहाणा करून वृद्धाच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेणाऱ्या आरोपीला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. आशु दत्ता जाधव (वय २५, रा. भोसले चौक, पंढरपूर, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचा साथीदार सोमनाथ धोंडीराम पोरे हा फरार आहे. पोलिसांनी या कारवाईत चोरीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, असा एकूण २ लाख २८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादी वृद्ध व्यक्ती शेगाव गावातून रेवणाळ रोडवरील शेताजवळ आले असताना पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्याशी बोलण्याचा बहाणा केला. त्यानंतर या दोघांनी वृद्धाच्या गळ्यातील बदाम व सोन्याची पेटी तसेच कानातील हुडकी असे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले आणि तेथून पलायन केले. या घटनेप्रकरणी जत पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. शेगाव परिसरात वृद्ध व्यक्तीचे दागिने लुटण्याची घटना पंढरपूर येथील आशु जाधव आणि त्याचा साथीदार सोमनाथ पोरे यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने संशयित आशु जाधव याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने साथीदार सोमनाथ पोरे याच्यासोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर वृद्धाकडून लुटलेले सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली सुझुकी कंपनीची अॅक्सेस १२५ दुचाकी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली. पंचांसमक्ष हा मुद्देमाल जप्त करून आरोपीला पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत १ लाख २८ हजार ४०० रुपये किमतीचे नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि अंदाजे एक लाख रुपये किमतीची अॅक्सेस १२५ दुचाकी, असा एकूण २ लाख २८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. फरार साथीदाराचा शोध आणि गुन्ह्याचा पुढील तपास जत पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्यासह सहायक पोलीस फौजदार अमित परीट, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ गुंडे, प्रकाश पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव यांनी सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या