तासगाव : तासगाव तालुक्यातील बिरणवाडी येथे बंद बंगल्याची खिडकी तोडून लोखंडी लॉकरसह मौल्यवान ऐवज चोरणाऱ्या टोळीचा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, भांडी, रोख रक्कम, घरफोडीसाठी वापरण्यात आलेली हत्यारे आणि मोटारसायकल असा एकूण १९ लाख २५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आणखी तीन संशयितांचा शोध सुरू आहे.
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा
बिरणवाडी येथील सावळज रोडवरील एका बंद बंगल्यात २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी नऊ वाजण्यापूर्वी घरफोडी झाली होती. चोरट्यांनी घराच्या हॉलमधील खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. त्यानंतर बंद खोल्यांची कुलपे तोडून घरातील साहित्य आणि सुमारे २३० किलो वजनाचा लोखंडी लॉकर चोरून नेला होता. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करून मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले होते.
दरम्यान, पथकातील अंमलदारांना तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारामार्फत नितीन यलमार, अक्षय बुधावले आणि उमाजी गुजले हे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मतकुणकी येथून वासुंबे परिसरातील ज्ञानसागर आंबेमळा अंगणवाडीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी आणि पंचांसमक्ष झडती घेतली असता, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चांदीची भांडी तसेच घरफोडीसाठी वापरली जाणारी साधने आढळून आली.
लॉकर फोडून दागिने आणि रोकड काढल्याची कबुली
पोलिसांनी मुद्देमालाबाबत विचारणा केली असता सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशी केल्यानंतर बिरणवाडी येथील बंद बंगल्यात घरफोडी करून लोखंडी लॉकर चोरून नेल्याचे त्यांनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
आरोपींनी हा लॉकर बलगवडे येथील उमाजी गुजले याच्या घरात नेऊन कटरच्या साहाय्याने फोडला. त्यातून सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रक्कम मिळाल्यानंतर त्यांची आपापसांत वाटणी केल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यातील काही दागिने आणि भांडी विक्री करण्यासाठी ते निघाले असताना पोलिसांनी त्यांना पकडले.
या गुन्ह्यात नितीन यलमार, अक्षय ऊर्फ नागेश बुधावले आणि उमाजी ऊर्फ बंडू नाईक गुजले यांना अटक करण्यात आली आहे. कुणाल मंडले, अशपाक सलाते आणि सुखदेव ढोबळे हे अन्य संशयित अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
१९.२५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ७ लाख ५७ हजार ८२० रुपये किमतीचे ५४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ९ लाख ५४ हजार ८०० रुपये किमतीची ४ किलो ३४० ग्रॅम वजनाची चांदीची भांडी व दागिने, १ लाख ३३ हजार ५०० रुपये रोख रक्कम, लोखंडी कटर, हायड्रॉलिक कटर, इलेक्ट्रिक ग्राइंडर मशीन आणि ७० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १९ लाख २५ हजार ४२० रुपये आहे.
अटक करण्यात आलेल्या नितीन यलमार आणि उमाजी गुजले यांच्यावर यापूर्वी दरोडा आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तासगाव पोलिसांकडे तपास
अटक आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोडसे करीत आहेत.
या कारवाईत पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकारी व अंमलदार आणि सायबर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या