प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: ढवळी येथील जुन्या सातारा रोडखाली येरळा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात तातडीने पाणी साठवणूक करावी,अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ढवळी व तुरची परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत तासगावच्या तहसीलदारांकडे निवेदन देऊन येत्या दोन दिवसांत ठोस कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.तासगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. मात्र, येरळा नदीवरील बंधाऱ्यात अद्याप पाणी साठवणूक करण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.येरळा नदीतून वाहून जाणारे पाणी बंधाऱ्यात अडवून त्याची साठवणूक केल्यास ढवळी आणि तुरची परिसरातील शेतीला मोठा आधार मिळू शकतो. तसेच परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होऊन नागरिकांनाही दिलासा मिळू शकतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून बंधाऱ्यात तातडीने पाणी साठवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
*प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम!*
पाण्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष न करता येत्या दोन दिवसांत बंधाऱ्यात पाणी साठवणुकीबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत कार्यवाही न झाल्यास शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पाणी साठवणुकीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.यावेळी ढवळी व तुरची परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या