प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कामेरी (ता. वाळवा) येथे एकाच रात्रीत पाच बंद घरांचे कडी-कोयंडे उचकटून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या सराईत घरफोडी टोळीचा म्होरक्या प्रविण राजा शिंदे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ईश्वरपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दोन कटावण्या, रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १० लाख ६७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील अन्य दोन संशयित साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कामेरी येथे ११ सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान ही घरफोडीची मालिका घडली होती. संतोष खाशेराव परीट, बाबू नानाभाऊ आंधळे, विजय बाजीराव पाटील, उज्वला गजानन जाधव आणि सारिका राजेंद्र सोनावले या पाच नागरिकांच्या घरांचे दरवाजे उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी व लाकडी कपाटांतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. एकाच रात्रीत पाच घरफोड्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि ईश्वरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. अभिलेखावरील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार, तसेच कारागृहातून सुटलेल्या आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून तपास सुरू करण्यात आला.
१२ ऑक्टोबर २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखालील पथक ईश्वरपूर आणि तासगाव विभागात गोपनीय माहिती घेत असताना पाचवा मैल चौक परिसरात एका संशयिताची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने संशयिताला शिताफीने ताब्यात घेतले.
सॅकमध्ये आढळला चोरीचा मुद्देमाल
ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव प्रविण राजा शिंदे (वय ३५, रा. गणेशवाडी रोड, वडूज, ता. खटाव, जि. सातारा) असे आहे. त्याच्या पाठीवरील सॅकची तपासणी केली असता त्यामध्ये दोन कटावण्या, रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने असा एकूण १० लाख ६७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
त्याचेसोबतचे ईतर दोन साथीदार यांची नांवे निष्पन्न झालेली असुन १) आर्यन कान्हा काळे रा. फडतरवाडी ता. खटाव जि.सातारा (परागंदा) २) अजय लायन्या शिंदे दोघे रा. फडतरवाडी ता. खटाव जि. सातारा (परागंदा) या दोन परागंदा आरोपींचा शोध पथक घेत आहे.
पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत त्याने आपल्या अन्य दोन साथीदारांसह कामेरी येथे पाच बंद घरांचे कडी-कोयंडे उचकटून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आर्यन कान्हा काळे आणि अजय लायन्या शिंदे या दोघांची नावे निष्पन्न झाली असून ते सध्या फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
आरोपीवर १५ हून अधिक गुन्हे
प्रविण शिंदे आणि त्याचे साथीदार सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी सांगली आणि सातारा जिल्ह्यांत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरी यांसारखे १५ हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या संयुक्त कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि ईश्वरपूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. फरार आरोपींचा शोध आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या