प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:दुष्काळजन्य परिस्थिती आणि आगामी द्राक्ष हंगामाच्या पार्श्वभूमीवर सावळज व परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार रोहित पाटील यांनी दुहेरी जलनियोजनाचा पुढाकार घेतला आहे. पुनदी योजनेतून सिद्धेवाडी तलावात पाणी सोडण्याबरोबरच सावळज-बिरणवाडी हद्दीतील वितरिकेतून थेट अग्रणी नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत त्यांनी टेंभू जल उपसा सिंचन प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.३० सप्टेंबर रोजी टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले. याबाबत सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रज्वल महाजन यांना लेखी पत्र देऊन सिद्धेवाडी तलावात पुनदी योजनेचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
*पाणीपट्टीची जबाबदारी स्वतः घेण्याची तयारी*
विशेष म्हणजे, सिद्धेवाडी तलावात पाणी सोडताना शेतकऱ्यांकडून स्वतंत्र मागणी अर्ज घेऊ नयेत तसेच त्यांच्यावर पाणीपट्टीचा आर्थिक भार टाकू नये, अशी मागणी रोहित पाटील यांनी केली आहे. आवश्यक असल्यास शेतकऱ्यांची पाणीपट्टीची रक्कम स्वतः भरण्याची तयारी असल्याचे त्यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे.दुष्काळाच्या काळात पाण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशासनिक प्रक्रिया किंवा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, या भूमिकेतून हा पुढाकार घेण्यात आला आहे.
*दोन मार्गांनी पाण्याचा प्रयत्न*
सावळज-बिरणवाडी हद्दीतील वितरिकेतून अग्रणी नदीपात्रात पाणी सोडल्यास नदीकाठच्या शेतीला फायदा होण्याची शक्यता आहे. तर सिद्धेवाडी तलावात पाणी उपलब्ध झाल्यास वायफळे, दहिवडी, सिद्धेवाडी, यमगरवाडी व बिरणवाडी परिसरातील शेतीला त्याचा उपयोग होणार आहे.टेंभू योजनेची दीर्घकालीन कामे पूर्ण होण्याची प्रतीक्षा न करता उपलब्ध यंत्रणेचा वापर करून सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. द्राक्ष हंगामाच्या निर्णायक टप्प्यावर पाण्याची उपलब्धता महत्त्वाची असल्याने प्रशासनाकडून होणाऱ्या कार्यवाहीकडे सावळज परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या