विजयपूर, दि. 1 : आलमट्टी धरणाची उंची वाढविल्यानंतर बबलेश्वर विधानसभा मतदारसंघातील 15 गावांमधील सुमारे 5,600 एकर जमीन पाण्याखाली जाणार आहे. या जमिनीच्या भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात किमान 500 कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी मंत्री एम. बी. पाटील यांनी जलसंपदा मंत्री एन. चेलुवरायस्वामी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आलमट्टी धरणाची उंची सध्याच्या 519.60 मीटरवरून 524.256 मीटर करण्याचे नियोजन आहे. यामुळे कृष्णा खोऱ्यातील 184 गावांतील 75,563 एकर जमीन बाधित होणार असून, त्यापैकी विजयपूर जिल्ह्यातील 31 गावांचा समावेश आहे. बबलेश्वर मतदारसंघातील 15 गावांतील सुमारे 5,600 एकर जमीन संपादित केली जाणार असल्याचे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
सध्या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आलेल्या चिक्कलगळी, शिरबूर, होसूर आणि कणबूर या चार गावांना प्राधान्य देऊन पहिल्या टप्प्यात 500 कोटी रुपयांची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. उर्वरित 10 गावांसाठीही अधिसूचना काढून भरपाई वितरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे पाटील यांनी म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या