सांगली प्रतिनिधी : सांगली– मिरज– कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विभागीय क्षेत्रीय कार्यालय क्रमांक २ अंतर्गत प्रभागातील स्वच्छता राखणे, सार्वजनिक ठिकाणी होणारे अतिक्रमण रोखणे आणि नियमबाह्य प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत विविध नियमभंगांप्रकरणी एकूण ₹१७,५०० दंड आकारण्यात आला.
या कारवाईमध्ये नियमबाह्य प्लास्टिक हाताळणीप्रकरणी ₹१०,०००, सार्वजनिक ठिकाणी कचरा केल्याप्रकरणी ₹५,०००, तर सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केल्याप्रकरणी ₹२,५०० दंडात्मक कारवाई करण्यात आली.
स्वच्छता व सार्वजनिक जागांच्या नियोजनबद्ध वापरासाठी मोहीम
वॉर्ड क्रमांक १८ मधील शामरावनगर परिसरात भाजीविक्रेते, फळविक्रेते, हातगाडीधारक तसेच लघुव्यावसायिकांच्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, प्रतिबंधित प्लास्टिकसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणे आणि सार्वजनिक जागांवर अनधिकृत अतिक्रमण करणे टाळावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळावा आणि सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करू नये. नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
या कारवाईमध्ये सहाय्यक आयुक्त महादेवी कुरणे, मुख्य स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी, स्वच्छता अधिकारी गणेश माळी, स्वच्छता निरीक्षक निवास साबळे, पंकज गोंधळे, महेश मद्रासी आणि कोमल कुदळे उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या वतीने नागरिक, विक्रेते आणि व्यावसायिकांना सार्वजनिक स्वच्छता राखण्याचे तसेच शहरातील सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या