प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली– मिरज– कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक ३ अंतर्गत विजयनगर चौक ते रेल्वे ब्रिज तसेच विजयनगर ते पर्ल हॉटेल परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये आणि परिसरातील रस्ते अतिक्रमणमुक्त राहावेत, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.
प्रभाग समिती क्रमांक ३ च्या सहाय्यक आयुक्त श्वेता सुर्वे ,अतिक्रमण अधीक्षक सचिन सागावकर, अतिक्रमण अधीक्षक नागार्जुन मद्रासी यांच्यासह अतिक्रमण विभागाची पथके व नगररचना विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबविली. यावेळी ध्वनिक्षेपकाद्वारे विनापरवाना हातगाड्या तात्काळ हटविण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
परवानाधारक फेरीवाल्यांचे नियोजित हॉकर झोनमध्ये स्थलांतर
विजयनगर परिसरातील परवाना असलेल्या २१ हातगाड्यांचे सतराळकर कॉम्प्लेक्सच्या पलीकडे असलेल्या महापालिकेच्या खुल्या जागेतील मंजूर हॉकर झोनमध्ये स्थलांतर करण्यात आले. तसेच सतराळकर कॉम्प्लेक्सच्या बाहेरील बाजूस अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या चार हातगाड्या हटविण्यात आल्या.
३ विनापरवाना हातगाड्या महापालिकेच्या विजयनगर येथील खुल्या जागेत हलविण्यात आल्या. याशिवाय एक सुरक्षा रक्षक केबिन आणि एक फायबर खोका हटविण्यात आला, तर तीन टी-स्टँड बोर्ड काढून टाकण्यात आले.
विजयनगर चौकात हातगाड्या लावल्यास जप्तीची कारवाई
मंजूर हॉकर झोनमध्ये केवळ परवानाधारक फेरीवाल्यांनाच जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या जागेवर विनापरवाना हातगाडी लावल्यास संबंधित हातगाडी हटवून जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तसेच यापुढे विजयनगर चौकात कोणत्याही फेरीवाल्याने हातगाडी लावू नये. हातगाडी लावल्याचे आढळल्यास संबंधित हातगाडी जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.
विजयनगर ते पर्ल हॉटेलपर्यंत अतिक्रमणे हटविली
विजयनगर चौकापासून पर्ल हॉटेलपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. रस्ते मोकळे ठेवणे, वाहतुकीतील अडथळे दूर करणे आणि सार्वजनिक जागांचा नियमानुसार वापर सुनिश्चित करणे, यासाठी महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू आहे.
महानगरपालिकेचे आवाहन : फेरीवाल्यांनी केवळ मंजूर हॉकर झोनमध्ये आणि वैध परवान्याच्या आधारेच व्यवसाय करावा. सार्वजनिक रस्ते, चौक व पादचारी मार्गांवर अनधिकृतपणे हातगाड्या लावू नयेत. नियमांचे उल्लंघन केल्यास हातगाडी हटविणे व जप्तीची कारवाई करण्यात येईल.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या