प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : समाजातील अनिष्ट रुढी-परंपरा, अंधश्रद्धा आणि शोषणाविरोधात अखंडपणे लढा देणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार गणेश कांबळे यांना यंदाचा मानाचा ‘प. रा. आर्डे स्मृती प्रेरणा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राहुल थोरात आणि उषाताई आर्डे यांनी दिली.
शनिवार दि. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता अंनिस राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये माहेश्वरी मल्टीपर्पज हॉल विश्रामबाग येथे जेष्ठ पत्रकार, संपादक विजय चोरमारे यांच्या
हस्ते हा पुरस्कार कांबळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. ५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमास मुक्ता दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव यांची उपस्थिती असेल.
पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी गणेश कांबळे यांनी दीर्घकाळ योगदान दिले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षांपासून शोषक प्रथांविरोधात आवाज उठवला असून, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध उपक्रम आणि वृत्तपत्रीय लेखनाच्या माध्यमातून प्रबोधन केले आहे. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीची आणि पत्रकारितेतील मूल्यांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या