मिरज, दि. २१ : गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, मिरज या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवत Quality Council of India (QCI) अंतर्गत Medical Assessment and Rating Board for Homoeopathy (MARBH), National Commission for Homoeopathy (NCH), New Delhi यांच्या मूल्यांकनात ‘A+’ ग्रेड मानांकन प्राप्त केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी मिळालेले हे मानांकन संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याची पावती मानली जात आहे.
महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापनाची पद्धती, पायाभूत सुविधा, रुग्णालयीन सेवा, विद्यार्थी सुविधा, प्रशासकीय व्यवस्था तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान या विविध बाबींच्या गुणवत्तेचा विचार या मूल्यांकन प्रक्रियेत करण्यात आला. या सर्व क्षेत्रांत संस्थेने सातत्यपूर्ण गुणवत्ता राखल्याने ‘A+’ मानांकन मिळाले आहे.
शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या विचारांना पुढे नेत संस्था गुणवत्तापूर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवा देण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक-चेअरमन पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांनी या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त, प्राचार्य, प्राध्यापक व अध्यापक वर्ग, रुग्णालयीन कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, इंटर्न्स आणि पालकांचे अभिनंदन केले.
“हे मानांकन संपूर्ण संस्थेच्या सामूहिक प्रयत्नांचे यश असून, भविष्यातही शिक्षण व आरोग्यसेवेची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील,” अशी भावना यावेळी कार्यकारी विश्वस्त अॅड. विरेंद्रसिंह पाटील यांनी व्यक्त केली.
या यशामध्ये कॅम्पस समन्वयक डॉ. सतिश पाटील, प्राचार्य डॉ. प्रताप भोसले, डॉ. राजेंद्र मेथे यांचे मार्गदर्शन व योगदान लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या