सांगली प्रतिनिधी : सांगलीवाडी येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन पैशांसह चोरून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या कारवाईत सांगलीसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात केलेले एकूण ११ गुन्हे उघडकीस आले असून, १० लाख ६८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगलीवाडी येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीनची १६ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन पैशांसह चोरून नेल्याने सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान आरोपींनी मोटारसायकल तसेच चारचाकी वाहनाचा वापर केल्याचे समोर आले.
दरम्यान, २७ सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार अनिल कोळेकर, नागेश खरात, सागर लवटे आणि अमर नरळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राजस्थान पासिंगच्या चॉकलेटी रंगाच्या महिंद्रा बोलेरो कॅम्पर गोल्ड वाहनाची तपासणी करण्यात आली. या वाहनात दोन संशयित आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी बहादुर प्रल्हादराम चौकीदार बावरी (वय ३६, रा. कुलीयाना, ता. परबतसर, जि. डिडवाना-कुचामन, राजस्थान) आणि गोपाल तेजाराम बावरी (वय ३४, रा. रावलियावास, ता. डेंगाना, जि. नागौर, राजस्थान) अशी नावे सांगितली.
पंचांसमक्ष झडती घेतली असता बहादुर बावरी याच्याकडे ५०० रुपयांच्या ३० नोटा, तर वाहनात एक स्प्लेंडर मोटारसायकल, गॅस सिलिंडर, गॅस कटर, दोरखंड, पट्टा आणि लोखंडी टॉमी आदी साहित्य आढळून आले. या साहित्याबाबत चौकशी केली असता आरोपींनी साथीदार अर्जुन मेघवाल याच्यासह सांगलीवाडी येथील एटीएम मशीन चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली.
आरोपींच्या माहितीनुसार पोलिसांनी लक्ष्मीफाटा ते कसबेडिग्रज रस्त्यालगतच्या उसाच्या शेतात पाहणी केली. तेथे चोरी केलेल्या एटीएम मशीनचे तुटलेले भाग आढळून आले. एटीएममधील काही रोकड आरोपी बहादुर बावरीकडे असल्याचे, तर उर्वरित रक्कम साथीदार अर्जुन मेघवाल घेऊन गेल्याचे तपासात समोर आले.
महाराष्ट्रासह तीन राज्यांतील ११ गुन्हे उघड
पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या चौकशीत सांगलीतील गुन्ह्यासह नाशिक, सोलापूर, नांदेड, सातारा जिल्ह्यातील फलटण तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एटीएम चोरीचे गुन्हे उघडकीस आले. तसेच आरोपींच्या ताब्यातील मोटारसायकलींपैकी काही वाहने फलटण आणि कर्नाटकातील हावेरी परिसरातून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी चोरीच्या ठिकाणापासून सुमारे ५० ते ६० किलोमीटर अंतरावरील ग्रामीण भागात भाड्याने खोली घेऊन राहत. परिसराची रेकी करण्यासाठी आजूबाजूच्या भागातून मोटारसायकली चोरी करत. कमी वर्दळीच्या आणि जमिनीपासून तीन ते चार फूट उंचीवर असलेली एटीएम मशीन ते शोधत. त्यानंतर रात्रीच्या वेळी बोलेरो कॅम्परला दोरखंडाने एटीएम मशीन बांधून वाहनाने ओढत ते तोडले जात असे. मशीन वाहनात टाकून निर्जन ठिकाणी नेल्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने ते कापून त्यातील रोकड काढली जात असल्याचे तपासात समोर आले.
ही टोळी एटीएम मशीन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी बहादुर चौकीदार याच्यावर ३० पेक्षा अधिक एटीएम मशीन चोरी व इतर चोरीचे गुन्हे, तर गोपाल बावरी याच्यावर ४० पेक्षा अधिक एटीएम मशीन चोरी व इतर चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१० लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त
या कारवाईत पोलिसांनी ८ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो कॅम्पर गोल्ड, दोन स्प्लेंडर मोटारसायकली प्रत्येकी एक लाख रुपये, एटीएम मशीनचे लोखंडी तुकडे, १५ हजार रुपये रोख, गॅस सिलिंडर, नोझल व पाईप, अग्निशामक सिलिंडर, हातोडा, नायलॉनचे दोरखंड, पट्टा, लोखंडी रॉड आणि दोन मोबाईल फोन, असा एकूण १० लाख ६८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सांगली सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी-अंमलदारांनी सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या