प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:सावळज येथील रामोशी वस्ती येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत भटक्या-विमुक्त जाती-जमातीतील नागरिकांसाठी हक्क व प्रमाणपत्र वाटपाचे विशेष शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.शासकीय सेवा व विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना स्थानिक पातळीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.शिबिरात जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, आयुष्मान भारत योजना आदी विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांकडून जात प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव स्वीकारण्यात आले, तसेच आधारकार्ड, रेशनकार्ड व पेन्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रियेची माहिती देण्यात आली.या उपक्रमांतर्गत विविध १०८७ लाभांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. यासोबतच आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांची आरोग्य तपासणीही करण्यात आली.शिबिरास तहसीलदार अतुल पाटोळे, नायब तहसीलदार धनश्री स्वामी, पुरवठा निरीक्षक प्रियांका माळी, सावळज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी, कृषी विभाग, आरोग्य विभागातील आशा वर्कर तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या निरीक्षक गायत्री फडणीस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.भटक्या-विमुक्त जाती-जमातीतील वस्त्यांवरील नागरिकांना यापुढेही विविध शासकीय लाभ व प्रमाणपत्रे प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार असून, नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या