प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर : जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारकांचे संवर्धन, पर्यटनस्थळांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत पर्यटनाला अधिक चालना देण्यात येईल, असे नागठाणचे आमदार विठ्ठल कटकधोंड यांनी सांगितले.
इब्राहिम रोजा परिसरात जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून पर्यटनाला नवी दिशा’ या संकल्पनेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन करून आमदार कटकोधोंड बोलत होते.
विजयपूरला गोलघुमटासह समृद्ध कला, वास्तुकला आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या स्मारकांचा इतिहास व महत्त्व विद्यार्थी आणि तरुणांना समजावून सांगून त्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. स्मारकांची माहिती डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहज उपलब्ध करून देत देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटनाच्या विकासामुळे स्थानिक व्यापार, वाहतूक, हॉटेल व्यवसाय, पर्यटन मार्गदर्शक तसेच लघुउद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होतील. परिणामी तरुणांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी वाढून जिल्ह्याच्या आर्थिक हालचालींना गती मिळेल, असेही कटकधोंड यांनी नमूद केले.
पर्यटन विकासात सर्वांनी सहभागी व्हावे
विजयपूरचे उपविभागीय अधिकारी जुफिशान हक यांनी सांगितले की, विजयपूर म्हटले की पूर्वी केवळ गोलघुमटाची आठवण होत असे. मात्र, जिल्ह्यात गोलघुमटासह हजारो ऐतिहासिक वास्तू व स्मारके आहेत. त्यांची माहिती अधिकाधिक नागरिक आणि पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या पर्यटन अॅपमध्ये जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, हॉटेल्स आणि पर्यटकांसाठी आवश्यक विविध माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यटकांना सुविधा देणारे असे उपक्रम पर्यटन विकासासाठी उपयुक्त ठरतील, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास ही सर्वांची जबाबदारी असून, पर्यटनस्थळांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
*एआयच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्याचा सल्ला*
विशेष व्याख्यानात सुमंगला बिरादार यांनी डिजिटल तंत्रज्ञान आणि एआयच्या प्रभावी वापरातून पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण करून अधिक पर्यटकांना विजयपूरकडे आकर्षित करता येईल, असे सांगितले.
पर्यटकांना तातडीने माहिती, मार्गदर्शन तसेच ऐतिहासिक स्मारकांचा इतिहास उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन क्षेत्रात एआय आधारित सेवा सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘डिस्कव्हर विजयपूर’ एआय अॅपचे लोकार्पण*
जागतिक पर्यटन दिनानिमित्त बीएलडीई संस्थेच्या डॉ. फ. गु. हळकाट्टी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी दत्ता व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेल्या ‘डिस्कव्हर विजयपूर’ या एआय अॅपचे लोकार्पण करण्यात आले.
हे अॅप विजयपूरला येणाऱ्या पर्यटकांसाठी डिजिटल मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. गोलघुमटासह प्रमुख आणि दुर्लक्षित ऐतिहासिक स्थळांची माहिती, पर्यटनाचे नियोजन, निवास व्यवस्था, स्थानिक खाद्यपदार्थ, अधिकृत पर्यटन मार्गदर्शकांची माहिती तसेच टांगा सफरीसारख्या पर्यटन अनुभवांची माहिती अॅपद्वारे उपलब्ध होणार असल्याचे पर्यटन विभागाचे उपसंचालक अरविंद हुगार यांनी सांगितले.
कार्यक्रमात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या विजयकुमार बंडी आणि पर्यटन मित्रांचा सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
यावेळी जिल्हा गॅरंटी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष वसंत होनमोड़े, नगरविकास प्राधिकरणाचे आयुक्त राजशेखर डंबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मल्लनगौड बिरादार, बीएलडीई संस्थेचे प्राचार्य मंजुनाथ पी., डॉ. वाय. तम्मण्णा, पीटर अलेक्झांडर, रवि बिज्जरगी, भीमराय जिगजिणगी, अडिवेप्प सालगल, डी. पी. जाधव, डॉ. अमीन हुल्लूर, गिरीश हनमरड्डी, केएसटीडीसी व्यवस्थापक जगदेवी केंबावी यांच्यासह विद्यार्थी, पर्यटन मित्र, नागरिक आणि पर्यटक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या