प्रतिष्ठा न्यूज /
किरण कुंभार
तासगाव:भारतीय अर्थव्यवस्थेत व्यापक सुधारणा घडवून आणण्याच्या प्रक्रियेत माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे मत शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. जे. ए. यादव यांनी व्यक्त केले.पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘डॉ. मनमोहन सिंग यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश एस. पाटील होते. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा. यादव म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. अर्थतज्ज्ञ, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी काम केले. १९९१ ते १९९६ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी व्यापक आर्थिक सुधारणांच्या धोरणाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, अशी नोंद भारत सरकारच्या माजी पंतप्रधानांच्या अधिकृत संकेतस्थळावरही आहे.आर्थिक उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरणाच्या धोरणांच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणण्यात त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, शिक्षणाच्या क्षेत्रातील विविध उपक्रम तसेच शांत आणि संयमी नेतृत्व ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती, असेही प्रा. यादव यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. सुरेश एस. पाटील म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आदर्श व चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रयत्न करावा.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. शंकर गावडे यांनी केले. स्वागत डॉ. कुलदीप पाटील यांनी केले, तर आभार डॉ. बंडू कदम यांनी मानले. यावेळी डॉ. विलास साळुंखे, प्रा. सुनिता यमगर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या