प्रतिष्ठा न्यूज
सांगली, प्रतिनिधी : पवनचक्क्यांमधील कॉपर केबल व ॲल्युमिनियमच्या विद्युत तारांची चोरी करणाऱ्या टोळीतील एका संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. लखन केशव शिंदे (वय २५, रा. विठ्ठलनगर, जत) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून जत पोलीस ठाण्यातील सात चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत १४ लाख ७४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते.
६ सप्टेंबर २०२६ रोजी या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन कनप यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती टाटा एस वाहनातून चोरीचे साहित्य विक्री करण्यासाठी घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी झुलेलाल मंदिर ते वुडलॅण्ड हॉटेल परिसरात सापळा रचला.
काही वेळाने बिना नंबरप्लेटचे टाटा एस वाहन तेथे येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनाच्या हौद्यात अॅल्युमिनियम व कॉपर वायरचे गुंडाळलेले बंडल आढळून आले. वाहनचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव लखन केशव शिंदे असल्याचे सांगितले.
पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, लखन शिंदे याने त्याचे साथीदार सोनू शिंदे आणि समर्थ ऊर्फ गुंडू मोरे, रा. जत यांच्या साथीने गेल्या वर्षभरापासून जत व परिसरातील पवनचक्क्यांमधून कॉपर व अॅल्युमिनियमच्या विद्युत तारा चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर जत पोलीस ठाण्यातील गुन्हे अभिलेख तपासला असता या टोळीशी संबंधित सात चोरीचे गुन्हे उघडकीस आले. यामध्ये जत पोलीस ठाण्यातील गुन्हा रजि. क्र. ६२/२०२६, २१२/२०२६, २२५/२०२६, ३७३/२०२६, ४६५/२०२६, ४८१/२०२६ व ३६६/२०२६ या गुन्ह्यांचा समावेश आहे.
१४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपीकडून ८ लाख ५० हजार रुपये किमतीची अॅल्युमिनियम कंडक्टर केबल व विद्युत तार, १ लाख २३ हजार ५६० रुपयांची कॉपर केबल, ८१ हजार ९०० रुपयांची सबमर्शीबल केबल, ६८ हजार ८०० रुपयांचे कट पॉईंट चॅनेल तसेच ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे टाटा एस मालवाहू वाहन असा एकूण १४ लाख ७४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.
जप्त मुद्देमाल, वाहन व आरोपीला पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या