गगनबावडा : गगनबावड्याच्या मातीत जन्मलेला आणि कोल्हापूरच्या शिक्षण क्षेत्रात आयुष्यभर ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा एक महान दीपस्तंभ – आदरणीय कै. गणपतराव नारायणराव (ग. ना.) चिकणीस गुरुजी. शिक्षकी पेशाचे आणि कृतार्थ आयुष्याचे मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या गुरुजींनी वयाची १०२ वर्षे पूर्ण करून देवाज्ञा घेतली. आज ते आपल्यात नसले, तरी त्यांनी शिकवलेली गणिताची सूत्रे आणि पेरलेले माणुसकीचे संस्कार हजारो विद्यार्थ्यांच्या हृदयात कायम जिवंत आहेत.
'रूक्ष' विषयात पेरला रसाळपणा
विद्यापीठ हायस्कूलमध्ये सेवा बजावताना चिकणीस गुरुजींनी गणितासारखा 'रूक्ष' विषय आपल्या मराठी भाषेवरील प्रभुत्वाने आणि रसाळ शैलीने अत्यंत सोपा करून शिकवला. त्यांची कडक शिस्त ही केवळ विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठीच होती, म्हणूनच ते हजारो विद्यार्थ्यांच्या हृदयावर राज्य करू शकले.
शाहू विचारांचे निष्ठावान पाईक
"आम्ही जे काही घडलो, ते केवळ राजर्षी शाहू महाराजांमुळे... जर महाराज नसते, तर आमचे जीवन कसपटासमान झाले असते," हे कृतज्ञतेचे उद्गार १०० व्या वर्षी काढणारे गुरुजी म्हणजे खऱ्या अर्थाने शाहू विचारांचे पाईक होते. त्यांचा हाच सुस्वभाव आणि ध्येयवादी वृत्तीचा वारसा त्यांचे चिरंजीव, महावितरणचे निवृत्त अभियंता श्री. प्रशांत चिकणीस समर्थपणे पुढे नेत आहेत.
स्मृती सन्मानार्थ 'पाढे पाठांतर स्पर्धा' व पारितोषिक वितरण!
शाळेचे आपल्या वयाची १०० वर्षे पूर्ण केलेले माजी गणित शिक्षक कै. ग. ना. चिकणीस यांच्या स्मृती सन्मानार्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताची रुची निर्माण व्हावी, या हेतूने संस्था अंतर्गत 'पाढे पाठांतर स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. इ. ५ वी ते १० वीच्या विजेत्या १० विद्यार्थ्यांना विद्यापीठ सोसायटीकडून प्रत्येकी रू. ७५००/- रोख व प्रमाणपत्र दिले जाते.
विद्यापीठ हायस्कूलच्या १०९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार, दि. ०३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठिक १० वाजता विद्यापीठ हायस्कूल येथे संपन्न होत आहे.
गुरुजींनी दिलेली माणुसकीची आणि कृतज्ञतेची सूत्रे कायम आपल्या पाठीशी राहतील. या पुण्यवान आत्म्यास शतश: प्रणाम!
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या