सांगली, दि. ४ : सांगली शहरातील सिव्हील हॉस्पिटल रोडवरील आर्या लॉज येथे ग्राहकांच्या मागणीनुसार महिलांना देहविक्रीसाठी पुरविले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम (ITPA) १९५६ तसेच बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सपना आडसुळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
फ्रीडम फर्म संस्थेमार्फत आर्या लॉज, सिव्हील हॉस्पिटल रोड, सांगली येथे ग्राहकांच्या मागणीनुसार महिलांना देहविक्रीसाठी पुरविले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहक पाठविला. त्यानंतर पथकाने लॉजवर छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली.
या प्रकरणात आरोपी नितीन मनोहर चौगुले (वय ३५, रा. नागाव, ता. वाळवा, जि. सांगली) हा एजंट गणेश तुपे (रा. चेंबूर, मुंबई) व अन्य एजंट प्रविण शिंदे (पत्ता उपलब्ध नाही) यांच्याशी संगनमत करून पीडित महिलांकडून देहविक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गणेश तुपे व प्रविण शिंदे हे दोघेही सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात ITPA Act १९५६ व BNS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक सपना आडसुळ, ग्रेड पीएसआय सुवर्णा गोडबोले, पोलीस हवालदार ६५५ गायकवाड, पोलीस हवालदार १९९६ गायकवाड, पोलीस हवालदार १३९९ गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल १००३ शिंदे तसेच फ्रीडम फर्म संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या