प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:शहरात सध्या पावसामुळे विविध ठिकाणी पाणी साचण्याचे प्रमाण वाढले असून, त्यातून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर तासगाव नगरपरिषदेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, घरासह परिसरात पाणी साचू न देण्याचे आणि आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन केले आहे.पावसाळ्यात घराच्या परिसरात, गच्चीवर, अंगणात तसेच विविध वस्तूंमध्ये पाणी साचण्याची शक्यता असते. या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी कुंड्या, पाण्याच्या टाक्या, जुने टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या बाटल्या, भंगार साहित्य तसेच इतर पाणी साठविणाऱ्या वस्तूंची नियमित तपासणी करावी. अनावश्यकपणे साचलेले पाणी तातडीने काढून टाकावे, तसेच पाण्याच्या टाक्या व इतर पाणीसाठे झाकून ठेवावेत, अशा सूचना नगरपरिषद प्रशासनाने केल्या आहेत.
‘आठवड्यातून एक दिवस—कोरडा दिवस’
डासांची उत्पत्ती प्रामुख्याने साचलेल्या पाण्यात होत असल्याने नागरिकांनी ‘आठवड्यातून एक दिवस—कोरडा दिवस’ उपक्रम प्रभावीपणे राबवावा. या दिवशी घरातील तसेच घराभोवतालच्या सर्व पाणी साठ्यांची तपासणी करून अनावश्यक पाणी काढून टाकावे. पाणी साठविणारी भांडी नियमितपणे रिकामी करून स्वच्छ करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, तासगाव नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध भागांत डास प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. आवश्यक त्या ठिकाणी औषध फवारणी तसेच साचलेल्या पाण्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र केवळ प्रशासनाच्या उपाययोजनांनी डासांचे प्रभावी नियंत्रण शक्य नसून, नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी घरासह आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा अथवा पाणी साचू देऊ नये. डासांची उत्पत्ती होण्याची ठिकाणे आढळून आल्यास त्याची माहिती तातडीने नगरपरिषद प्रशासनास द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.“स्वच्छ परिसर, डासमुक्त शहर, निरोगी नागरिक” या उद्देशाने सर्व नागरिकांनी डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन तासगाव नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, आरोग्य सभापती तसेच मुख्याधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या