प्रतिष्ठा न्यूज / दिपक शिंत्रे
विजयपूर : श्री चिदंबर महास्वामींच्या अप्रकाशित लीलाग्रंथ पठणाच्या 50व्या वर्षानिमित्त सुवर्णमहोत्सवाचे आयोजन शहरातील श्री शिव चिदंबर मंदिरात 6 ते 13 सप्टेंबरदरम्यान करण्यात आले आहे, अशी माहिती श्री चिदंबर सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी दिली.
श्री चिदंबरेश्वर मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने लोककल्याणार्थ 6 कोटी शिवचिदंबर नामजप, विविध होम-हवन, धार्मिक परिसंवाद, संगीत कार्यक्रम, भजन, कीर्तन तसेच सत्पुरुषांच्या प्रवचनांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 12 सप्टेंबर रोजी श्री नंजणगुड राघवेंद्रस्वामी मठापासून श्री चिदंबर मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समितीचे सचिव वेंकटेश जोशी नंदवाडगी यांनी सांगितले की, 6 ते 13 सप्टेंबरदरम्यान दररोज विविध कार्यक्रम होणार आहेत. लोककल्याणासाठी सत्पुरुषांचे स्मरण करण्यात येणार असून, आठ दिवसांच्या या कार्यक्रमात विविध मठांचे गुरू, संत-महंत तसेच लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
6 सप्टेंबर रोजी गोपूजेसह कार्यक्रमास प्रारंभ होईल. आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, गामनगट्टी येथील श्री गुरु चिदंबर दीक्षित गुरुजी यांचे सान्निध्य लाभणार आहे.
7 सप्टेंबर रोजी मंत्री एम. बी. पाटील तसेच आमदार दिनेश गुंडूराव आणि विश्वास वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सवदत्ती येथील श्री दंडपाणी दीक्षित गुरुमहाराज यांचे सान्निध्य लाभणार आहे.
8 सप्टेंबर रोजी धर्मदर्शी पं. मध्वाचार्य मोकाशी आणि खासदार रमेश जिगजिणगी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार असून, कर्कीहळ्ळी येथील सुरेश पाटील महाराज यांचे सान्निध्य लाभणार आहे.
9 सप्टेंबर रोजी आमदार सुनीलगौड पाटील आणि विठ्ठल कटकेदोंड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सिंदगी येथील श्री दत्ताप्पय्या स्वामी यांचे सान्निध्य लाभणार आहे.
10 सप्टेंबर रोजी अदम्य चेतना संस्थेच्या तेजस्विनी अनंतकुमार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून, अगडी येथील श्री गुरुदत्त चक्रवर्ती यांचे सान्निध्य लाभणार आहे. यावेळी विशेष महिला परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
11 सप्टेंबर रोजी आमदार शिवानंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, अगडी येथील श्री विश्वनाथ चक्रवर्ती यांचे सान्निध्य लाभणार आहे.
12 सप्टेंबर रोजी श्री चिदंबर महास्वामींच्या अप्रकाशित लीलाग्रंथ पठणाच्या 50व्या वर्षाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याच दिवशी भव्य शोभायात्राही काढण्यात येणार आहे.
13 सप्टेंबर रोजी सुवर्णमहोत्सवाचा समारोप समारंभ होणार असल्याचे वेंकटेश जोशी यांनी सांगितले.
समितीचे सदस्य राघवेंद्र जोशी यांनी सांगितले की, सुमारे 50 वर्षांपूर्वी केवळ चार जणांनी सुरू केलेली चिदंबर सेवा समिती आज मोठ्या वटवृक्षाप्रमाणे विस्तारली आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
पत्रकार परिषदेस समितीचे उपाध्यक्ष अंबादास जोशी, कार्यकारी मंडळाचे सदस्य वेदमूर्ती शंकरभट्ट अग्निहोत्री, व्ही. सी. कुलकर्णी, सी. के. पाटील, राघवेंद्र जोशी, सुधींद्र जोशी, वेंकटेश जोशी, विजय जोशी आणि उपेंद्र देसाई उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या